अंजनवती येथे अखंड हरिनाम सप्ताहात रक्तदान शिबिर संपन्न
बीड (दि.०९): बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील अंजनवती येथे श्री संत तुकाविप्र महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू असून यंदा ५१ व्या वर्षाचा महोत्सव साजरा केला जात आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आध्यात्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
“रक्तदान हेच श्रेष्ठदान” या भावनेतून गावातील तरुण मंडळी व ग्रामस्थांनी एकत्र येत या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिराचा शुभारंभ श्री संत तुकाविप्र महाराज पालखी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा दिंडीचालक ह.भ.प. अर्जुन महाराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भारत बबनराव येडे पाटील व बाळासाहेब विजयराव येडे पाटील हे प्रारंभीचे रक्तदाते ठरले. गावातील तरुणांनी केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे भजनी मंडळ व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमास पैठण येथील सुप्रसिद्ध गायनाचार्य ह.भ.प. रामेश्वर महाराज मस्के, विठ्ठलराव अंजनवतीकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोरे पाटील, अशोकराजे येडे, बाजीराव भूमकर, सिद्धार्थ सोनवणे यांच्यासह बीड येथून आलेले डॉक्टर व आरोग्य कर्मचारी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने भक्तीबरोबरच समाजसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
Comments
Post a Comment