विश्व बंजारा दिनानिमित्त बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरेचा उजाळा

विश्व बंजारा दिनानिमित्त बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरेचा उजाळा

 ८ एप्रिल हा दिवस देशभरात विश्व बंजारा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सन २००७ पासून बंजारा युवा संघटनांच्या पुढाकारातून या दिवसाचे औचित्य साधले जात असून, बंजारा समाजाच्या समृद्ध इतिहास, संस्कृती व परंपरांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातो.
राजस्थान ही मूळ भूमी असलेला बंजारा समाज आज महाराष्ट्रासह पंजाब, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत मोठ्या प्रमाणावर विखुरलेला आहे. पारंपारिकदृष्ट्या पशुपालक आणि व्यापारी म्हणून ओळख असलेल्या या समाजाने देशाच्या विविध भागांत धान्य व मीठ वाहतुकीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
बंजारा समाजाची ओळख त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा, लोककला, भजन-कीर्तन आणि सामूहिक नृत्यांमधून प्रकर्षाने दिसून येते. विशेषतः महिलांची पारंपारिक वेशभूषा, चांदीचे दागिने, नक्षीदार घागरे आणि नाण्यांनी सजवलेले वस्त्र हे या समाजाचे सांस्कृतिक वैशिष्ट्य मानले जाते.
पूर्वी भटक्या जीवनशैलीत राहणारा हा समाज ‘तांडा’ पद्धतीने समूहात वास्तव्य करत असे. तांड्याचा प्रमुख ‘नाईक’ म्हणून ओळखला जात असून, सामाजिक व प्रशासकीय निर्णय त्याच्या मार्गदर्शनाखाली घेतले जात. कालांतराने सामाजिक व आर्थिक बदलांमुळे या समाजाने स्थिर जीवनशैली स्वीकारली असून, शिक्षणाच्या माध्यमातून मोठी प्रगती साधली आहे.
ऊसतोड मजुरीसारख्या कठीण कामातून जीवन जगणाऱ्या बंजारा समाजाने शिक्षणाचे महत्त्व ओळखत नव्या पिढीला पुढे आणले. आज या समाजातील युवक-युवती विविध शासकीय सेवांमध्ये कार्यरत असून, प्रशासकीय उच्च पदांवरही त्यांनी स्थान मिळवले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांसारख्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
बंजारा समाजाचा इतिहास हा प्राचीन संस्कृतीपर्यंत पोहोचणारा असून, त्यांच्या परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक रचना आजही जपली गेली आहे. बदलत्या काळानुसार समाजाने स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणत शिक्षण, प्रशासन आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
विश्व बंजारा दिनाच्या निमित्ताने समाजाच्या या समृद्ध वारशाचा गौरव करण्यात येत असून, नव्या पिढीने या परंपरेचे जतन करत प्रगतीच्या वाटेवर पुढे जाण्याचा संकल्प करावा एवढेच अपेक्षित आहे.
संकलन व लेखन :
श्री बाजीराव ढाकणे
बीड जिल्हा समन्वयक, महा एनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य ९४२१९८९९०९

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी