महापुरुषांच्या अनाधिकृत स्मारकांविरोधात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन
महापुरुषांच्या अनाधिकृत स्मारकांविरोधात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन
बीड (दि.०६): राज्यात महापुरुषांच्या नावाखाली अनाधिकृत पुतळे व स्मारके उभारण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासनाच्या पुतळा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (संभाजीनगर परिक्षेत्र) यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस चऱ्हाटकर, मुबीन शेख, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड) रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक बीड), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष, विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था, बीड) , सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे , भिमराव कुटे आदी उपस्थित होते.
सविस्तर:
राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता रातोरात महापुरुषांचे पुतळे उभारले जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः वादग्रस्त ठिकाणी उभारण्यात आलेल्या अशा अनाधिकृत स्मारकांमुळे समाजात तणाव निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने २ मे २०१७ रोजी पुतळा धोरणासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, त्यानुसार पुतळा उभारण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. तसेच पुतळ्याचे ठिकाण वादग्रस्त नसावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, उंची व साहित्याला तांत्रिक मान्यता असावी, तसेच कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन शपथपत्र व ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच पुतळे उभारावेत, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका डॉ. गणेश ढवळे यांनी यावेळी व्यक्त केली.
Comments
Post a Comment