३५३ चा गुन्हा दाखल करण्याची धमकी; अंबेवेस पुलाच्या शुभारंभावरून नगरसेवक नितीन बागवाले आक्रमक
३५३ चा गुन्हा दाखल करण्याची धमकी; अंबेवेस पुलाच्या शुभारंभावरून नगरसेवक नितीन बागवाले आक्रमक
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रथम पर्यायी पूल उभारावा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
अंबेवेस परिसरातील जुन्या पुलाच्या पुनर्निर्माणासाठी आज शुभारंभ करण्यात आला असला, तरी या कामाच्या पद्धतीवर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक नितीन बागवाले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार न करता घाईघाईत शुभारंभ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अंबेवेस येथील पूल हा प्रभाग क्रमांक १६ मधील अत्यंत महत्त्वाचा वाहतूक दुवा असून, या भागातील नागरिकांना दररोज ये-जा करण्यासाठी याच पुलाचा आधार आहे. त्यामुळे जुना पूल पाडण्यापूर्वी नागरिकांसाठी पर्यायी पुलाची व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे बागवाले यांनी स्पष्ट केले.
नगर परिषदेच्या मंजूर इस्टीमेटमध्येच सुमारे ९ लाख रुपयांची तरतूद पर्यायी पुलासाठी करण्यात आलेली असताना, सत्ताधाऱ्यांनी त्या कामाकडे दुर्लक्ष करून थेट मुख्य पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ करणे हे निष्काळजीपणाचे व नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणारे असल्याची टीका त्यांनी केली.
पावसाळ्यात हा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे पर्यायी पूल उभारल्याशिवाय मुख्य काम सुरू करणे योग्य नाही, असे ठाम मत नितीन बागवाले यांनी व्यक्त केले. तसेच, नागरिकांच्या सोयी-सुविधा आणि सुरक्षितता हाच विकासाचा खरा पाया असून, केवळ औपचारिक शुभारंभ करून जनतेच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणे निंदनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अंबेवेस परिसरातील नागरिकांनीही नितीन बागवाले यांच्या मागणीला समर्थन दर्शवले असून, लवकरात लवकर पर्यायी पूल उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.
लोकप्रतिनिधीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न-नगरसेवक नितीन बागवाले
अंबेवेस परिसरातील जुन्या पुलाच्या पुनर्निर्माणासाठी शुभारंभ करण्यात आला ही चांगली बाब आहे. मात्र, नगरपरिषदेच्या इस्टिमेटमध्ये प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी पुलासाठी ९ लाख रुपयांची तरतूद असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
याबाबत मी आवाज उठवला असता सत्ताधारी पक्षाच्या वतीने माझ्यावर ३५३ चा गुन्हा दाखल करण्याची धमकी विद्यमान नगराध्यक्षांच्या पतीकडून देण्यात आली. लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे दडपण्याचा प्रयत्न होणे निंदनीय असून, हा प्रकार लोकशाहीस घातक आहे.
Comments
Post a Comment