पाटोदा शहरात दहावीपर्यंत एकही जिल्हा परिषद शाळा नाही हे पाटोद्याचे भाग्य की दुर्भाग्य?
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरात दहावीपर्यंत शिक्षण देणारी एकही जिल्हा परिषद शाळा उपलब्ध नसल्याची बाब समोर येत असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा ही सर्वसामान्य कुटुंबांसाठी शिक्षणाचा आधारस्तंभ मानली जाते. मात्र पाटोदा शहरातच अशी सुविधा नसणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे. शहरातील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी खासगी शाळांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर अतिरिक्त भार पडत आहे. अनेक पालकांनी शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पाटोदा शहरात दहावीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.शिक्षण हा मूलभूत हक्क असताना, शहरातच शासकीय शिक्षणाची सोय नसणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा भाग असल्याची भावना व्यक्त होत आहे. काही जणांच्या मते, खासगी शिक्षण संस्थांना चालना मिळत असल्यामुळे शासन जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष करत आहे,असा सवालही उपस्थित केला जात आहे.पाटोदा शहराचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर शिक्षण क्षेत्रात भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता तरी संबंधित विभागाने जागरूक होऊन योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment