सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
माजलगाव (प्रतिनिधी): माजलगाव तालुक्यातील चाहूरतांडा (तालखेड) येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून ज्योती कृष्णा पवार (वय २६) या विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत.
मयत ज्योती यांचे लग्न २०१८ मध्ये कृष्णा मनोहर पवार याच्याशी झाले होते. फिर्यादी आई संद्राबाई शामराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर काही वर्षे नीट नांदवल्यानंतर पती कृष्णा हा ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला. तसेच "तू रंगाने काळी आहेस, मला आवडत नाहीस" असे म्हणून हिणवत असे. यासोबतच, माहेरून गुत्तेदारीच्या कामासाठी पैसे आणण्यासाठी पती, सासरा मनोहर पवार आणि सासू ताराबाई पवार यांनी तिला वारंवार उपाशीपोटी ठेवून त्रास देण्यास सुरुवात केली होती.
१२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सासरच्या छळाला कंटाळून ज्योतीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. धक्कादायक बाब म्हणजे, तिने विष घेतल्याचे समजूनही सासरच्यांनी तिला दवाखान्यात नेले नाही. माहेरच्या लोकांनी आल्यानंतर तिला तातडीने माजलगाव, त्यानंतर संभाजीनगर आणि अखेर पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र, १८ जानेवारी रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
ज्योतीला ७ वर्षांची मुलगी आणि ३ वर्षांचा मुलगा अशी दोन लहान मुले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
१. कृष्णा मनोहर पवार (पती)
२. मनोहर पवार (सासरा)
३. ताराबाई मनोहर पवार (सासू)
पोलीस गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपींचा शोध घेत आहेत, मात्र अद्याप ते हाती लागलेले नाहीत. माजलगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Comments
Post a Comment