सायकलवरून अवतरला सांता, सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल बर्दापूरमध्ये ख्रिसमसचा जल्लोष
सायकलवरून अवतरला सांता, सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल बर्दापूरमध्ये ख्रिसमसचा जल्लोष
अंबाजोगाई | प्रतिनिधी
सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूर येथे ख्रिसमस सण अत्यंत आनंदी, उत्साही व संस्मरणीय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. मधुकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात आगळ्यावेगळ्या उपक्रमाने झाली. शिक्षिका अर्पिता कुलकर्णी या सांता क्लॉजच्या वेशात सायकलवरून शाळेत दाखल झाल्या. सायकलवरून येणाऱ्या सांता क्लॉजला पाहताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला. सांता क्लॉजने विद्यार्थ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत खाऊ वाटप केले.
या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष मा. श्री. ताराचंद शिंदे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत प्रेम, शांतता व एकात्मतेचा संदेश दिला. शाळेमध्ये असे उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास अमोल भडके, निकिता शिंपले, पंकजा पवार, जना माने, सुनिता सोनवणे, सीमा कोरडे, समिना अत्तार हे शिक्षक उपस्थित होते. तसेच शाळेच्या मावशी सुमनबाई जोगदंड व इतर कर्मचारीवर्गाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ख्रिसमस गीतं व आनंदी घोषणांद्वारे कार्यक्रमाची रंगत वाढवली. मुख्याध्यापक श्री. मधुकर जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ख्रिसमसचा खरा अर्थ सांगितला व आनंद वाटणे, एकमेकांबद्दल प्रेम ठेवणे आणि समाजात सकारात्मकता निर्माण करणे या मूल्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.
या आनंददायी ख्रिसमस उत्सवामुळे शाळेचा परिसर उत्साह व आनंदाने भारावून गेला असून हा दिवस विद्यार्थ्यांसाठी कायम स्मरणात राहणारा ठरला.
Comments
Post a Comment