बार्शी नाका परिसरात धुरवडीच्या दिवशी रक्तरंजित राडा; अमोल कांबळे या रिक्षाचालकावर सहाजणांचा जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक
बीड | प्रतिनिधी
धुरवडीच्या दिवशी बीड शहरातील बार्शी नाका परिसरात मंगळवारी सायंकाळी भीषण मारहाणीची घटना घडून परिसरात खळबळ उडाली. इमामपूर रोडवरील प्रकाश आंबेडकर नगर येथे पाच ते सहा जणांच्या टोळीने रिक्षाचालक अमोल कांबळे यांच्यावर लोखंडी रॉड व लाकडांनी जीवघेणा हल्ला करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अमोल कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ मार्च रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. अचानक झालेल्या हल्ल्यात अमोल कांबळे यांच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आले. लोखंडी रॉड व लाकडांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शरीरावरही मारहाणीचे गंभीर व्रण दिसून आले आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी अमोल कांबळे यांची भेट घेतली. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, पोलिसांनी जखमीचा जबाब नोंदवून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन रक्ताचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश भोले करत आहेत. दरम्यान, धुरवडीच्या दिवशी घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे बार्शी नाका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Comments
Post a Comment