मतदारांनी २००२ च्या यादीशी लिंक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी

मतदारांनी २००२ च्या यादीशी लिंक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी

मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बीएलओ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

सभापती निजाम शेख यांची नागरिकांना सूचना
बीड : मतदार यादी अचूक आणि अद्ययावत राहावी तसेच आगामी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांची माहिती २००२ मधील मतदार यादीशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मतदारांनी आपल्या प्रभागातील बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्याशी तात्काळ संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन नगरपरिषदेचे सभापती निजाम शेख यांनी केले आहे.

मतदार यादीतील माहिती योग्य व अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा मतदार यादीत पत्ता बदल, नावातील चुका किंवा प्रभागातील बदल यामुळे मतदानाच्या वेळी मतदारांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा अडचणी टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन मतदार यादीतील माहिती तपासून घ्यावी आणि आवश्यक असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

प्रशासनाच्या वतीने सध्या मतदार यादी अद्ययावत करण्याचे तसेच मतदारांचे मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या परिसरातील बीएलओ यांची भेट घेऊन मतदार यादीतील नाव, पत्ता व इतर माहिती योग्य आहे का याची खात्री करून घ्यावी. आवश्यक कागदपत्रांसह मॅपिंग प्रक्रिया पूर्ण केल्यास भविष्यात मतदानाच्या वेळी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असेही सभापती निजाम शेख यांनी नमूद केले.

विशेषतः ज्या नागरिकांची नावे २००२ मधील मतदार यादीत नोंद होती त्यांनी आपली माहिती तपासणे आवश्यक आहे. विवाहित महिलांनी आपल्या आई-वडील किंवा आजी-आजोबा यांच्या मतदार यादीतील भाग क्रमांक व अनुक्रमांक शोधणे गरजेचे आहे. यामुळे माहिती पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

नागरिकांना मतदार यादीतील माहिती शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी खालील संकेतस्थळावर जाऊन राज्य, जिल्हा, मतदारसंघ, मतदाराचे नाव आणि कॅप्चा भरून आपली माहिती तपासू शकतात.
संकेतस्थळhttps://voters.eci.gov.in/searchInSIR मतदारांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केल्यास मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तसेच मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक राहण्यास मदत होईल. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सभापती निजाम शेख यांनी केले आहे.




मतदारांनी काय करावे?

• मतदार संघाचे नाव व क्रमांक तपासणे
• मतदार यादीतील भाग क्रमांक शोधणे
• अनुक्रमांक पडताळून पाहणे

आवश्यक कागदपत्रे

• आधार कार्ड
• मोबाईल क्रमांक
• नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी