परिवहनमंत्री प्रताप सरनाईक साहेब! शिवनेरी, शिवशाही नंतर ‘राजमाता जिजाऊ’ बस परंतु “लालपरीची” दैना फिटणार कधी ? – नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी : डॉ. गणेश ढवळे
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक साहेब! शिवनेरी, शिवशाही नंतर ‘राजमाता जिजाऊ’ बस परंतु “लालपरीची” दैना फिटणार कधी ? – नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी : डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.०९)राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वराज्य संकल्पना प्रेरिका "राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ नव्या “राजमाता जिजाऊ” नावाच्या ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.
एसटी महामंडळाने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा विविध नावांनी बससेवा सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली “लालपरी” आजही दुरावस्थेत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.
अनेक ठिकाणी एसटी बसची अवस्था अतिशय खराब असून प्रवाशांना मोडकळीस आलेल्या व धोकादायक बसमधून प्रवास करावा लागत आहे. याकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सोमवार (दि. ०९) रोजी अंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करताना एसटी बसमधील आसनव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसून आली. याबाबत बस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ही अवस्था अनेक दिवसांपासून असल्याचे सांगण्यात आले.
एसटीच्या दुरावस्थेच्या यापूर्वीही तीन घटना
बीड जिल्ह्यात यापूर्वी २६ जुलै २०२५ रोजी एसटीच्या दुरावस्थेचे दर्शन घडवणाऱ्या तीन घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
पाटोदा – बीड – परभणी मार्गावरील बस पावसात गळत होती. छत खराब असल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर पडत होते आणि प्रवाशांना छत्री घेऊन बसण्याची वेळ आली होती.
नेकनूर ते मांजरसुंभा दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते लातुर जाणाऱ्या (एमएच-२४ एयू ८३३५) बसचे चाक निखळून पडले होते. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
अंबेजोगाई – अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये छत गळत असल्याने एका प्रवाशाला चालकाच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहावे लागले होते.
या घटनांमुळे “लालपरी”मधून प्रवास करणे अनेक ठिकाणी धोकादायक ठरत असून नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment