मुळुकवाडी – मसेवाडी शिवरस्त्याचा २५ वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे ग्रामस्थांकडून आभार –
मुळुकवाडी – मसेवाडी शिवरस्त्याचा २५ वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे ग्रामस्थांकडून आभार –
लिंबागणेश (दि.११): बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मुळुकवाडी ते मसेवाडी शिवरस्त्याचा प्रश्न तब्बल २५ वर्षांपासून प्रलंबित होता. भूमी अभिलेख कार्यालयात तीन वर्षांपूर्वी २१ हजार रुपये मोजणी शुल्क भरूनही प्रत्यक्ष मोजणी होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
अखेर वस्तीवरील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर तहसीलदार शेळके यांनी कठोर भूमिका घेत पोलिस बंदोबस्तात रस्त्याच्या खुणा करून देत रस्ता मोकळा करून दिला.
सरपंच रामकिसन कदम व पांडुरंग कानडे यांनी पुढाकार घेऊन रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना होणारी अडचण दूर झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे आभार मानले आहेत.
पावसाळ्यातील अडचण दूर – ग्रामस्थ
पावसाळ्यात शाळा सुरू झाल्यानंतर शाळकरी मुलांना गुडघाभर चिखलातून शाळेत जावे लागत होते. तसेच आठवडी बाजार, भाजीपाला, दूध-दुभते, खत-बियाणे आणणे तसेच दवाखान्यात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. तहसीलदार शेळके यांच्या सहकार्यामुळे ही २५ वर्षांपासूनची समस्या दूर झाली असून आम्ही त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, अशी भावना ग्रामस्थ शाकींदर काटकर यांनी व्यक्त केली.
तहसीलदारांच्या कठोर भूमिकेमुळे प्रश्न सुटला – डॉ. ढवळे
गेल्या २५ वर्षांपासून पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तीन वर्षांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयात २१ हजार रुपये मोजणीसाठी भरूनही मोजणी होत नव्हती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देत तहसीलदार शेळके यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. सुरुवातीला खुणा करूनही काही ग्रामस्थ सहकार्य करत नसल्याने शेवटी पोलिस बंदोबस्तात रस्ता मोकळा करण्यात आला. तहसीलदार शेळके यांच्या ठाम भूमिकेमुळे ग्रामस्थांचा २५ वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला, असे मत डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment