अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांना “मातृभूमी समाजरत्न” पुरस्कार
संघर्षाचा झेंडा राज्यस्तरावर फडकला!
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांना “मातृभूमी समाजरत्न” पुरस्कार
बीड (प्रतिनिधी ) :
कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरणारे इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांना राज्यस्तरीय “मातृभूमी समाजरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले. संघर्षातून नेतृत्व सिद्ध करणाऱ्या जमाले यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मातृभूमी प्रतिष्ठान आयोजित भव्य सोहळ्यात अध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांच्या हस्ते जमाले यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी जमाले यांच्या धडाडीच्या नेतृत्वाचे आणि निर्भीड भूमिकेचे कौतुक केले.
जिल्ह्यातील कामगार प्रश्न, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हक्क, शासकीय योजनांतील त्रुटी, तसेच विविध विभागांतील अनियमिततेविरोधात जमाले यांनी मोर्चे, धरणे, निवेदने आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला आहे. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांवर त्यांनी उघडपणे टीका करत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यामुळे जिल्ह्यात संघर्षशील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
पुरस्कार स्वीकारताना जमाले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले,
“हा सन्मान माझ्या एकट्याचा नाही; तो अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या प्रत्येक कामगाराचा आहे. संघर्ष थांबणार नाही, तो अधिक तीव्र होईल.”
बीड जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या या सन्मानामुळे कामगार चळवळीत नवचैतन्य निर्माण झाले असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment