चांदापुर येथे बाराव्या बौद्धधम्म परिषदेचा शानदार समारोप
चांदापुर येथे बाराव्या बौद्धधम्म परिषदेचा शानदार समारोप
जगाला युद्धाची नाही तर बुध्दाची गरज - पुज्य भिक्खू करूणानंद महाथेरो
परळी (वार्ताहर)
परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर (तिर्थक्षेत्र दर्जा - क प्राप्त) येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी बाराव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेचे उद्घाटन पुज्य भिक्खू करूणानंद महाथेरो (संचालक, द ग्रेट हॅपिनेस चॅनल) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली, बीड) आणि पुज्य भिक्खू पय्यावर्धन (हिंगोली) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती.
मागील ११ वर्षांपासून बौद्ध धम्म उपासकांसाठी नांवारूपास आलेले सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी, जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी, वसंतनगर तांडा, मौजे चांदापूर (ता.परळी) येथे शनिवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी येथे बाराव्या बौद्ध धम्म परिषदेची सुरूवात पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने करण्यात आली. या परिषदेस भिक्खू करूणानंद महाथेरो, पु.भिक्खू धम्मशील, पु.भिक्खू पय्यावर्धन (हिंगोली) यांचे अनमोल धम्म मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रवचनातून समाजात धम्म, समता, बंधुता आणि करूणेचा संदेश देण्यात आला. यावेळी धम्म परिषदेचे कार्यवाह ऍड.अनंतराव जगतकर, ले.कर्नल डॉ.एम.एच.कांबळे (अंबाजोगाई), डॉ.राजेश इंगोले (सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ), संग्राम गित्ते (सरपंच, चांदापूर), सौ.शाहू विजय राठोड (सरपंच, वसंतनगर तांडा), आनंद तुपसमुद्रे (बौद्धाचार्य, परळी वै.), मिलिंद नरबागे (परळी वै.), आनंद वाघमारे (समाजभूषण, पट्टीवडगाव), प्रशांत गित्ते (चांदापूर), सुरेश मिसाळ (घाटनांदूर) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सरोजाताई गौतम डावरे, अर्चनाताई महेंद्र रोडे, नितीन नामदेव रोडे, महादेव नागनाथ रोडे, कविताताई अनंत इंगळे, तसेच परळी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक - नगरसेविका यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी धम्म देसना देताना पुज्य भिक्खू करूणानंद महाथेरो म्हणाले की, भारत ही बुद्धभूमी आहे. सम्राट अशोक यांनी भारतासह जगात बुध्द धम्म रूजविला. तर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुध्द धम्माचे पुनरूज्जीवन केले. त्यामुळे जगाला युद्धाची नाही तर बुध्दाची, शांतीची, डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची जगाला गरज आहे. धम्म आचरणाने माणूस सदाचारी बनतो. धम्मात प्रज्ञा-शील-करूणा-समता आहे. धम्मच जगाला तारू शकतो. म्हणून मला बुद्ध प्रिय आहे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. येणाऱ्या पिढ्यांवर धम्म संस्कार करणे, धम्मावर श्रध्दा ठेवणे, प्रत्येक रविवारी विहारात जाणे, धम्म परिषदा घेणे, भिक्खूंची प्रवचने ऐकणे, धम्म ग्रंथांचे वाचन करणे, धर्मकार्य करणे, धम्मदान करणे गरजेचे आहे. पैसे घेऊन मतदान न करता गुणवत्तेला महत्त्व द्यावे, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर घराघरात जन्माला आले पाहिजेत. धम्म आचरण ही काळाची गरज असल्याचे पुज्य भिक्खू करूणानंद महाथेरो यांनी सांगितले. यावेळी पुज्य भिक्खू धम्मशील थेरो यांनी धम्म परिषदस उपस्थित उपासक, उपासिका यांना सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या. व धम्म आचरणाने माणूस सदाचारी, गुणवान, नितीमान बनतो. श्रध्दा, शील, करूणा आणि प्रज्ञा या गोष्टी आचरणात आणा, धम्म समजून घ्या, दु:ख मुक्त होण्यासाठी धम्म आचरण करावे लागेल. सागर मनाचा जिथे शुद्ध, तिथे बुध्द आहे. नशापान, खोटे बोलणे, निंदा, हिंसा आदी दुर्गुण नष्ट झाले पाहिजेत. मनात औदार्य ठेवा असे पुज्य भिक्खू धम्मशील थेरो यांनी सांगितले. यावेळी पुज्य भिक्खू पय्यावर्धन यांनी आपण शुध्द झाले पाहिजे, भिक्खू तयार करणे, ज्ञानी माणसं तयार करणे हा या धम्म परिषदेचा मुख्य उद्देश आहे. मानवी जीवनात धम्म अविभाज्य घटक आहे. धम्म विवेक जागृत करून समजून घ्या, धम्म आचरणात मानवी जीवनाचे कल्याण सामावले आहे. धम्मच जगाला दु:ख मुक्त करू शकतो. ती शिकवण धम्मात आहे. धम्म आचरणासाठी आपण सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे पुज्य भदन्त पय्यावर्धन म्हणाले. या प्रसंगी ऍड.अनंतराव जगतकर, डॉ.राजेश इंगोले, नगरसेवक अर्चनाताई रोडे, प्रा.डॉ.प्रदीप रोडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजेंद्र घोडके यांनी केले. तर सुत्रसंचालन राहुल सुरवसे, सचिन रणखांबे यांनी करून उपस्थितांचे आभार जगन सरवदे यांनी मानले. धम्म परिषदेच्या ठिकाणी परळी ग्रामीण पोलीस यांचे सुरक्षा पथक उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच तालुका आरोग्य विभागाकडून आरोग्य पथक आणि परळी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता वाहन उपलब्ध करून देण्यात आले होते. या धम्म परिषदेत महत्वपूर्ण १३ ठराव मांडण्यात येवून ते पारित करण्यात आले. हे ठराव केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले. ठरावांचे वाचन प्रा.गौतम गायकवाड यांनी केले. धम्म परीषदेच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरातील रमाई चौक, कबीरनगर, सिध्दार्थ नगर, भीमनगर, तसेच तालुक्यातील जवळगाव, पुस, घाटनांदूर, उजनी, पट्टीवडगाव, नागापूर, दौनापूर, मांडवा (प), डाबी सिरसाळा, चिखली, पानगाव, येल्डा, नाथ्रा, कौठळी, टोकवाडी, नंदागौळ, जिरेवाडी या गावांतून धम्म रॅली काढण्यात आली, धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी वै.,जि.बीड) चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे, प्रा.प्रदीप रोडे, राजेंद्र घोडके, राहुल घोडके, उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड, सचिन वाघमारे, जगन सरवदे, विश्वनाथ भालेराव, सीमाताई इंगळे, निलकांत हजारे, अर्जुन काळे, प्रा.बालाजी जगतकर, सचिन रणखांबे, डॉ.बबन मस्के, मनिषाताई पांडुरंग पाखरे, समाधान तरकसे, चंद्रकांत बनसोडे, सुभाष ताटे, प्रज्ञाताई इंगोले, वर्षाताई गायकवाड, मंजुश्रीताई मधुकर कांबळे, राजीव हजारे, पंकज भटकर, मिलिंद शिंदे, शाहीर गौतम सरवदे ,सुभाष वाघमारे, राज जगतकर, आकाश वेडे सुभाष चोपडे, कैलास वेडे, संतोष शिनगारे आदींनी पुढाकार घेतला होता. बारावी बौद्ध धम्म परिषद हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सामाजिक जागृती, समता आणि बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार करणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. दरवर्षीप्रमाणेच बारावी बौद्ध धम्म परिषद ही अत्यंत भव्य आणि प्रेरणादायी स्वरूपात आयोजित करण्यात आली. संपूर्ण परिसर धम्ममय वातावरणाने नटला होता. यावेळी हजारो उपासक, उपासिका व धम्मप्रेमी नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment