युवकांना आधी रोजगार व व्यवसायासाठी कर्ज द्या, तरच होतील लग्न; प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी सुरू करा युवकांची मागणी
पाटोदा (प्रतिनिधी ) सध्याच्या काळात ग्रामीण भागातील युवकांसमोर बेरोजगारीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. शिक्षण पूर्ण करूनही अनेक युवकांना नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळत नसल्यामुळे त्यांचे भविष्य अंधारात जात आहे. त्यामुळे युवकांना तातडीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच युवा शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांकडून सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी युवकांकडून करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील अनेक तरुण शेतीसोबतच लघुउद्योग, दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक उद्योग सुरू करण्यास उत्सुक आहेत. मात्र भांडवलाच्या अभावामुळे त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. त्यामुळे शासनाने बँकांमार्फत कमी व्याजदरात कर्ज योजना राबवून युवकांना आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.यासोबतच प्रत्येक तालुक्यात औद्योगिक विकासासाठी एमआयडीसी उभारण्यात यावी, अशीही मागणी पुढे येत आहे. जर तालुकास्तरावर उद्योगधंदे सुरू झाले तर स्थानिक युवकांना त्यांच्या गावाजवळच रोजगार मिळू शकतो. त्यामुळे स्थलांतर थांबेल आणि ग्रामीण भागाचा आर्थिक विकासही वेगाने होईल.युवकांना रोजगार मिळाला,उद्योगधंदे वाढले आणि आर्थिक स्थैर्य आले तर अनेक युवकांची लग्नेही होतील व त्यांचे कौटुंबिक जीवन स्थिर होईल. त्यामुळे शासनाने युवकांच्या या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचलावीत,अशी मागणी युवकांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment