वेतन ‘एक तारखेलाच’ द्या; अन्यथा कारवाई करा – सूर्यकांत जोगदंड यांचा इशारा
बीड प्रतिनिधी :
शासनाच्या स्पष्ट आदेशानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तांचे पेन्शन दर महिन्याच्या एक तारखेलाच अदा करणे बंधनकारक असतानाही, अनेक कार्यालय प्रमुखांकडून जाणूनबुजून विलंब केला जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
कास्ट्राईब व इतर कर्मचारी संघटनांच्या वतीने सूर्यकांत जोगदंड यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की, “वेतन व पेन्शन उशिरा देणे ही केवळ निष्काळजीपणा नसून कर्मचाऱ्यांवरील अन्याय आहे. कार्यालय प्रमुखांकडून मुद्दाम खोडसाळपणे विलंब केला जात असल्याचे चित्र आहे, जे सहन केले जाणार नाही.”
एप्रिल महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सम्राट अशोक जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती यांसारखे महत्त्वाचे सामाजिक उपक्रम पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर समाज बांधवांना वेळेवर आर्थिक तरतूद होणे अत्यावश्यक असून, पगार व पेन्शन वेळेवर मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून सर्व कार्यालय प्रमुखांना कडक सूचना द्याव्यात, तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी कास्ट्राईब व संघटनांनी केली आहे.
“जर वेतन व पेन्शन वेळेवर झाले नाही, तर कर्मचारी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील,” असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment