नायगाव जिल्हा परिषद शाळेतील वृक्षतोड प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? गणेश मोहळकर यांचा प्रशासनावर गंभीर आरोप


पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीच्या प्रकरणावर प्रशासनाने अक्षरशः डोळेझाक केल्याचा संतप्त आरोप महात्मा फुले युवा दलाचे तालुकाप्रमुख गणेश मोहळकर यांनी केला आहे. तब्बल 30 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने हे प्रकरण जाणीवपूर्वक दडपले जात असल्याची शंका व्यक्त होत आहे.शाळेच्या आवारातील अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या व विद्यार्थ्यांना सावली देणाऱ्या झाडांची कोणतीही परवानगी न घेता कत्तल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड उन्हाचा त्रास सहन करावा लागत असून, पर्यावरणाच्या हानीकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.या संदर्भात तहसीलदार, वनविभाग, गट शिक्षण अधिकारी तसेच कृषी विभाग यांना लेखी तक्रारी देण्यात आल्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून “कर्मचारी वर्ग कमी आहे” अशी कारणे देत उघडपणे वेळकाढूपणा केला जात आहे. ही कारणे देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असल्याचा थेट आरोप मोहळकर यांनी केला आहे.“विद्यार्थ्यांच्या हितासाठी लावलेली झाडे तोडली जातात आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेतं, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे का?” असा थेट सवालही मोहळकर यांनी उपस्थित केला आहे.ग्रामस्थ आणि पालकांमध्ये या प्रकारामुळे तीव्र संतापाची लाट उसळली असून, तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जन आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नसून, या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी गणेश मोहळकर यांनी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी