शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना पोलिस पाटील पदासाठी प्राधान्य द्यावे – इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांची मागणी
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना पोलिस पाटील पदासाठी प्राधान्य द्यावे – इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांची मागणी.
वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा
बीड प्रतिनिधी : जिल्ह्यात तसेच राज्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांवर मोठे आर्थिक व सामाजिक संकट कोसळत आहे. अशा परिस्थितीत या कुटुंबांना आधार देण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना पोलिस पाटील पदाच्या भरतीमध्ये विशेष प्राधान्य देण्याचा निर्णय शासनाने तातडीने घ्यावा, अशी जोरदार मागणी इंटकचे बीड जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रामधन जमाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात रामधन जमाले यांनी म्हटले आहे की, आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. या दुर्दैवी घटनांमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर मोठे संकट ओढवते. विशेषतः त्यांच्या कुटुंबातील वारसांना अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगावे लागते.
अशा परिस्थितीत शासनाने केवळ मदतीच्या घोषणा न करता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्यक्ष आधार देणारे ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. पोलिस पाटील पदाच्या भरतीमध्ये या कुटुंबातील वारसांना प्राधान्य दिल्यास त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल तसेच समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळेल, असे रामधन जमाले यांनी नमूद केले.
शासनाने शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाकडे केवळ आकडेवारी म्हणून न पाहता मानवी संवेदनेच्या दृष्टीने पाहून आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकरी व कामगार संघटनांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही रामधन जमाले यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment