महाजनवाडी येथील गायरान पेटलं की पेटवलं?; ग्रामस्थांची चौकशी करून कारवाईची मागणी
लिंबागणेश : (दि.१२) बीड तालुक्यातील महाजनवाडी येथे अहमदपूर ते अहिल्यानगर महामार्गालगत जनावरांच्या चाऱ्यासाठी संरक्षित असलेली सुमारे १२२ एकर गायरान जमीन गुरुवारी (दि.१२) सकाळी साडेअकराच्या सुमारास आगीत भस्मसात होण्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गायरानाला लागलेली आग नेमकी कशी लागली याबाबत ग्रामस्थांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.
जवळील शेतात काम करत असलेले सुजित घरत यांच्या निदर्शनास आगीचे लोट येताच त्यांनी तात्काळ सहकाऱ्यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. वाढते तापमान, उन्हाळ्यातील तीव्र उष्णता, सुकलेले गवत तसेच काही वेळा दारू पिणाऱ्या व्यक्तींनी पेटवलेल्या बिडी-सिगारेटमुळे गायरान जमिनीत आग लागण्याच्या घटना यापूर्वीही घडल्याचे सरपंच विश्वंभर गिरी यांनी सांगितले. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सुजित घरत यांच्यासह महेश गिरी, शुभम घरत, सुधीर घरत, अक्षय आबदार, गणेश हिंदोळे, दादाराव घरत, रोहन घरत, दादा पठाण आदी ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने आणि मेहनतीने आग आटोक्यात आणली. आग इतरत्र पसरू नये यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीत नांगराचे तास टाकुन आग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गायरानला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होत असून या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment