जिल्हा परिषद शिक्षकांची ‘बीएलओ’ नियुक्ती ग्रामीण शिक्षणावर परिणामकारक; शैक्षणिक गुणवत्तेला धक्का – डॉ. गणेश ढवळे



बीड (दि.१७) – जिल्हाधिकारी बीड विवेक जान्सन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेसाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दि.१० मार्च ते २० मार्च या कालावधीत ही मोहीम राबवली जात असून, शिक्षकांना पूर्णवेळ बीएलओ ड्युटीसाठी पाठविण्यात आले आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता तीव्र झाली असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी १ किंवा २ शिक्षकांवर संपूर्ण शाळेचा कारभार सांभाळण्याची वेळ आली आहे. परिणामी शिक्षकांवर शारीरिक व मानसिक ताण वाढत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालक व शिक्षकांकडून होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की, परीक्षा कालावधी अगदी जवळ आलेला असताना शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करणे म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेला हरताळ फासण्यासारखे आहे.

पालकांची चिंता व्यक्त
लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील पालक लेनाजी गायकवाड यांनी सांगितले की, “आधीच शिक्षकांची संख्या अपुरी आहे. त्यात बीएलओसाठी शिक्षकांना पाठवल्यामुळे एकाच वर्गात दोन वर्गांचे विद्यार्थी शिकत आहेत. पुढील महिन्यात परीक्षा असल्याने आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने पर्यायी उपाययोजना करावी.”

शिक्षकांवर वाढता ताण
लिंबागणेश केंद्रीय प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सुवर्णा गिते यांनी सांगितले की, शाळेत १२२ विद्यार्थी असून ४ वर्ग आहेत. त्यापैकी २ शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती झाल्यामुळे उर्वरित शिक्षकांना एकत्रित वर्ग घेऊन अध्यापन करावे लागत आहे. त्यामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढला आहे.

दरम्यान, पालक व शिक्षकांनी प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी