देवाभाऊ बोलून मोकळे झाले! ३६० खाटांच्या रुग्णालयासाठी ३०४ कोटींची घोषणा; पण २१ कोटींची माता-बालसंगोपन इमारत साडे ३ वर्षांपासून धुळखात – डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.०७): राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्हा रुग्णालयाच्या ३६० खाटांच्या विस्तारीकरणासाठी ३०४ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुमारे २१ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली माता व बालसंगोपन इमारत गेल्या साडे तीन वर्षांपासून फर्निचर, अग्निरोधक यंत्रणा, लिफ्ट आदींसाठी आवश्यक निधी न मिळाल्याने धुळखात पडून असून अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी दिली.
या इमारतीसाठी केवळ १० कोटी रुपयांच्या निधीअभावी काम रखडलेले असतानाही शासनस्तरावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डॉ. ढवळे यांनी सहकाऱ्यांसमवेत गेल्या तीन वर्षांपासून शासन दरबारी निवेदने देत तसेच विविध आंदोलनांद्वारे तत्कालीन पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.
दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी इमारतीची पाहणी करून जिल्हा नियोजनमधून ३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. त्या निधीतून काही कामे पूर्ण झाली; मात्र इमारत पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी अजूनही सुमारे ७ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून अद्याप निधी मंजूर करण्यात आलेला नाही, असे डॉ. ढवळे यांनी सांगितले.
यामुळे ३६० खाटांच्या रुग्णालयासाठी जाहीर करण्यात आलेल्या ३०४ कोटी रुपयांच्या निधीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून “ही केवळ बोलून मोकळं होण्याची घोषणा असून बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात” असल्याची प्रतिक्रिया डॉ. ढवळे यांनी व्यक्त केली.
बीड जिल्हा रुग्णालयाची सध्याची इमारत अपुरी पडत असून त्याच ठिकाणी सोनोग्राफी व एक्स-रे विभाग कार्यरत आहेत. दररोज सुमारे ४०० हून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात; मात्र व्हरांड्यात केवळ १५ ते २० रुग्णांसाठीच बसण्याची व्यवस्था असल्याने गर्भवती महिलांना ताटकळत उभे राहावे लागते. आयपीडी विभागातही गर्दी वाढल्याने उपचारात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करून माता-बालसंगोपन रुग्णालयाची इमारत कार्यान्वित करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment