६ महिने उलटूनही चार्जशीट नाही; न्यायासाठी आईचा आक्रोश, पोलीस अधीक्षकांकडे निवेदन
बीड (प्रतिनिधी) – परळी तालुक्यातील नंदागौळ येथील श्रीनाथ गोविंद गित्ते या तरुणाने संस्थाचालकांच्या जाचाला कंटाळून २२ ऑगस्ट २०२५ रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही तब्बल सहा महिने उलटून गेले तरी संबंधित आरोपींविरुद्ध अद्याप चार्जशीट दाखल करण्यात आलेली नसल्याने मृत तरुणाची आई सुनिता गोविंद गित्ते यांनी पोलीस अधीक्षक, बीड यांच्याकडे निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, या प्रकरणी आरोपी म्हणून उध्दव माणिक कराड व संजय परसुराम राठोड या संस्थाचालकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. तसेच या संदर्भात २४ ऑगस्ट व २९ ऑगस्ट २०२५ रोजी विविध संघटनांकडून तसेच स्वतःकडूनही तक्रार अर्ज देण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांनंतरही तपासाची प्रक्रिया पूर्ण होऊन चार्जशीट दाखल करण्यात आलेली नाही.
सुनिता गित्ते यांनी सांगितले की, त्या सध्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असून त्यांच्या कुटुंबात कर्ता पुरुष कोणीच उरलेला नाही. संबंधित संस्थाचालकांनी शासनाची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले असून त्याबाबतचे पुरावेही सादर केल्याचा दावा केला आहे. भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशाच्या जोरावर आरोपी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा आणि संबंधित आरोपींविरुद्ध पुढील १५ दिवसांच्या आत न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. अन्यथा आपल्या मुलीसह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून आता पोलीस प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment