माहिती देण्यास पाटोदा नगरपंचायतीची टाळाटाळ; दत्ता वाघमारे यांचा अर्धनग्न आमरण उपोषणाचा इशारा
पाटोदा (प्रतिनिधी ) माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेली माहिती वेळेत न देता पाटोदा नगरपंचायतीकडून टाळाटाळ सुरू असल्याचा आरोप करत दत्ता नाथा वाघमारे यांनी संताप व्यक्त केला असून, पुढील पाच दिवसांत माहिती न दिल्यास नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर अर्धनग्न स्वरूपात बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता वाघमारे यांनी 30 डिसेंबर 2025 रोजी माहिती अधिकार कायद्यांतर्गत तसेच वैयक्तिक हस्तलिखित स्वरूपात पाटोदा नगरपंचायतीकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये “माहिती अधिकार नमुना पत्र ‘अ’ व माहिती अधिकार द्वितीय अपील नुसार सुधारीत प्रस्तावासह पाठविण्यात आलेल्या कागदपत्रांची माहिती” मागविण्यात आली होती. नियमानुसार सदर माहिती 30 जानेवारी 2026 पर्यंत देणे बंधनकारक होते.मात्र, पाटोदा नगरपंचायतीकडून अद्यापही माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. उलट वारंवार नगरपंचायत कार्यालयाकडून टाळाटाळीची उत्तरे दिली जात असून माहिती देण्यास जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.यामुळे संतप्त झालेल्या वाघमारे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, पुढील पाच दिवसांत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यास पाटोदा नगरपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अर्धनग्न स्वरूपात बेमुदत आमरण उपोषणास बसणार असून त्या दरम्यान घडणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेची सर्वस्वी जबाबदारी पाटोदा नगरपंचायत प्रशासन व संबंधित कर्मचारी वर्गावर राहील,असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान,या प्रकरणामुळे माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पाटोदा नगरपंचायत प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment