पाटोदा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचा अभिनव उपक्रम : सहभागी शाळांना ३२ इंची एलईडी टीव्ही भेट
पाटोदा (प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये परिसरातील अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दल जागृती व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांमध्ये एकूण १३ शाळांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या सर्व शाळांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीने अभिनव उपक्रम राबवत प्रत्येक शाळेला ३२ इंची एलईडी टीव्ही बक्षीस स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला.समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः संबंधित शाळांना भेट देत या टीव्हींचे वितरण केले. या उपक्रमामुळे शाळांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओ, डिजिटल शिक्षण तसेच विविध माहितीपर कार्यक्रम पाहण्यासाठी आधुनिक साधन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच चालना मिळणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.शिवजयंती उत्सव केवळ साजरा न करता त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा समितीचा हा प्रयत्न सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरत आहे.सहभागी सर्व १३ शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे मनापासून आभार व्यक्त केले असून भविष्यातही अशा उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Comments
Post a Comment