अजितदादा बीड नगरपालिका भंगार चोर आणि वृक्षतोड्या निघाली ! सरकारी दवाखान्यातील भंगार उचल व वृक्षतोड प्रकरण तापले :- डॉ.गणेश ढवळे


बीड :- ( दि.२७ )बीड नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराची ‘भागवत कथा’ आता उघडकीस येण्याच्या मार्गावर असून, या प्रकरणामुळे नगरपालिका व आरोग्य विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी दवाखान्यातील भंगार अवैधरीत्या उचलण्यात आल्याचा तसेच परिसरातील झाडांच्या मोठ्या फांद्यांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

या प्रकरणात नगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असून, नगरपालिका मुख्याधिकारी आणि सिव्हिल सर्जन दोघेही ‘तोंडावर बोट’ ठेवून गप्प बसल्याची स्थिती असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नेमकी परवानगी कोणी दिली? भंगार कुठे नेण्यात आले? त्याची नोंद कुठे आहे? या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे.
रात्रीच्या अंधारात भंगार उचललं; तीन दिवसांचा प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बीड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूचे लोखंडी शेड उघडून भंगार टेम्पोमध्ये भरून नेले. विशेष म्हणजे हा प्रकार सलग तीन दिवस रात्रीच्या वेळी करण्यात आला. यासाठी दवाखान्याच्या मागील गेटचा वापर करण्यात आला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी पालिका भांडार विभाग सांभाळणारे भागवत जाधव यांचे नाव सांगितले. जाधव यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मुख्याधिकारी यांचे नाव पुढे केले. मात्र, अधिक तपासात मुख्याधिकाऱ्यांनी कोणताही लेखी आदेश दिलेला नसल्याचे स्पष्ट झाले.
भंगाराबरोबर वृक्षतोड; परवानगी कुणाची?

या प्रकरणात केवळ भंगार उचलच नव्हे, तर दवाखान्याच्या परिसरातील अनेक वर्षे उभ्या असलेल्या वडाच्या झाडाच्या मोठमोठ्या फांद्याही तोडण्यात आल्याचा आरोप आहे. यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एकीकडे शासन वृक्षलागवडीला प्रोत्साहन देते आणि दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच वृक्षतोड होत असेल, तर पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
कारवाई का होत नाही? जनतेत संशय

या प्रकरणाला आठवड्याहून अधिक काळ उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नगरपालिकेचे मुख्याधिकारी कर्तव्यदक्ष व कडक प्रशासक म्हणून ओळखले जात असतानाही या प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याची चर्चा आहे.

ज्या दवाखान्याच्या परिसरातून भंगार उचलले गेले, त्या दवाखान्याचे प्रशासनही मौन बाळगत आहे. त्या वेळी असलेले सिव्हिल सर्जन बदलीवर गेले असून, नवीन सिव्हिल सर्जन यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. दोन्ही यंत्रणा गप्प असल्याने जनतेत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

गणेश ढवळे यांनी पालकमंत्री अजितदादा यांना लेखी तक्रार 

या संपूर्ण प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांना लेखी तक्रार केली असुन प्रशासनाला दिलेल्या निवेदनात थेट सवाल उपस्थित केले आहेत –

 “सरकारी माल म्हणजे कुणाच्या खासगी मालमत्तेसारखा उचलायचा का?
झाडांची तोड कुणाच्या आदेशाने झाली?
आणि हे सगळे घडत असताना प्रशासन गप्प का?”


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी