निवडून येताच ॲक्शन मोड! प्रभाग १४ चे नवनिर्वाचित नगरसेवक कामाला लागले; स्वतः उभे राहून करून घेतली साफसफाई
बीड (प्रतिनिधी):बीड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून अवघा आठवडा उलटत नाही तोच, प्रभाग क्रमांक १४ मधील नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद शिंदे आणि रणजीत बनसोडे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. प्रचारावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत, या दोन्ही लोकप्रतिनिधींनी प्रभागातील स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले असून, स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून साफसफाई करून घेतल्याने नागरिकांकडून कौतुक होत आहे.
बीड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून प्रमोद शिंदे आणि रणजीत बनसोडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. निकाल लागल्यानंतर सत्कार समारंभाच्या गर्दीत न अडकता, त्यांनी थेट जनतेच्या समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
ही बाब लक्षात घेता, आज शिंदे आणि बनसोडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रभागातील विविध गल्ल्या आणि मुख्य रस्त्यांची साफसफाई करून घेतली. केवळ आदेश न देता, हे दोन्ही नगरसेवक सकाळपासून स्वतः रस्त्यावर उभे राहून कामाचे नियोजन करत होते.
निवडणूक संपली की लोकप्रतिनिधी पाच वर्षे दिसत नाहीत, असा सर्वसामान्य अनुभव असतो. मात्र, प्रभाग १४ मधील या दोन्ही तरुण नगरसेवकांनी निवडून आल्यावर अवघ्या सात दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यामुळे प्रभागातील रहिवाशांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.
"आम्ही ज्या विश्वासाने त्यांना निवडून दिले, त्या विश्वासाला त्यांनी पहिल्याच आठवड्यात सार्थ ठरवले आहे. कामाचा हाच उत्साह भविष्यातही कायम राहील, अशी आम्हाला खात्री आहे," अशी भावना प्रभागातील ज्येष्ठ नागरिकानी व्यक्त केली.
पुढील काळातही रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सोयीसुविधांसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद शिंदे व रणजीत बनसोडे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment