लिंबागणेश येथे हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू,बेलेश्वर संस्थान मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन
लिंबागणेश | (दि. ३१)
नाफेड कृषी पणन मंडळाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेंतर्गत लिंबागणेश (ता. बीड) येथे नागनाथ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, खंडाळा यांच्या वतीने शासकीय हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा शुभारंभ मंगळवार (दि. ३०) रोजी श्री गुरू ईश्वर भारती बाबा बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या शुभहस्ते झाला.
या खरेदी केंद्रामुळे लिंबागणेश पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी सुरक्षित, पारदर्शक आणि हमीभावाची विश्वासार्ह सुविधा उपलब्ध होणार आहे. यावर्षी सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ₹५,३२८ इतका हमीभाव जाहीर करण्यात आला असून, सध्याच्या बाजारभावापेक्षा अधिक दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हमीभाव योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, बाळकृष्ण थोरात, सुरेश निर्मळ, सुधीर वाणी, प्रदीप चौरे, श्रीनिवास चौरे, चव्हाण सर तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खरेदी प्रक्रिया व नोंदणी:
नोंदणी क्रमांकानुसार शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना पाठवून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. खरेदीसाठी सोयाबीन स्वच्छ, वाळवलेले व गुणवत्तापूर्ण असणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे—
चालू वर्षाची ई-पीक नोंद असलेला डिजिटल ७/१२ व ८-अ उतारा,आधारकार्ड,राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
ही कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांनी स्वतः केंद्रावर उपस्थित राहून ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऊशिरा का होईना, हमीभाव केंद्रे सुरू—शेतकऱ्यांना दिलासा : डॉ. गणेश ढवळे
राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य दर मिळावा यासाठी अखेर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांना सुरुवात झाली आहे. राज्य शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत २०२५–२६ हंगामासाठी केंद्रे सुरू झाली असली, तरी उशिरा प्रारंभ झाल्याने काही नाराजी होती. मात्र आता योग्य दराने विक्रीची संधी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गणेश ढवळे यांनी केले.
Comments
Post a Comment