बीड नगरपरिषदेतील भाजपच्या गटनेतेपदी डॉ.सारिकाताई क्षीरसागर
बीड (प्रतिनिधी)
दि.२६ : बीड नगरपरिषदेतील भाजपच्या नगरसेवक गटाच्या गटनेतेपदी डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांची निवड शुक्रवारी (दि.२६) करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या निवडीच्या ठरावाची पत्र जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे देण्यात आली.
नगरपरिषदेत भाजपचे १५ नगरसेवक विजयी झाले असून भाजपने प्रभावी कामगिरी करत मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. आता गटनेते पदाची जबाबदारी डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, डॉ.योगेश क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, जिल्हा सचिव शांतिनाथ डोरले, जिल्हा सरचिटणीस गणेश लांडे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह नेते, पदाधिकारी, सहकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत, बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment