महावितरणचा 'शॉक'! सहा महिन्यांपासून जातेगावचा फिडर बंदच; शितल धोंडरे यांचा आंदोलनाचा इशारा

महावितरणचा 'शॉक'! सहा महिन्यांपासून जातेगावचा फिडर बंदच; शितल धोंडरे यांचा आंदोलनाचा इशारा

प्रशासकीय दिरंगाईचा कळस; ग्रामस्थांच्या नुकसानीला जबाबदार कोण? ७ दिवसांचा अल्टिमेटम

बीड: जिल्ह्यातील जातेगाव (ता. गेवराई) येथील ग्रामस्थांच्या हक्काचा 'गावठाण फिडर' महावितरणच्या फाईलमध्ये अडकून पडला आहे. काम पूर्ण होऊन सहा महिने उलटले तरी फिडर चार्ज न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा श्रीमती शितल धोंडरे यांनी महावितरण प्रशासनाला धारेवर धरले आहे. "जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून यंत्रणा उभी केली, मग ती सुरू करायला मुहूर्त कोणाचा पाहत आहात?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
यंत्रणा असूनही गाव अंधारात
जातेगाव येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रात गावठाण फिडरचे काम तांत्रिकदृष्ट्या पूर्ण झाले आहे. मात्र, महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा फिडर कार्यान्वित करण्यात आलेला नाही. परिणामी, संपूर्ण गावाचा भार जुन्या यंत्रणेवर येत असून 'लो-व्होल्टेज'मुळे नागरिकांचे घरगुती संसारोपयोगी साहित्य (टीव्ही, फ्रिज, एसी) निकामी होत आहेत. वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे ग्रामस्थ हैराण झाले असून महावितरणविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
यात्रा काळात गोंधळ उडण्याची शक्यता
येत्या काही दिवसांत जातेगावचा ऐतिहासिक ग्रामदैवत यात्रा उत्सव संपन्न होणार आहे. या यात्रेला हजारो भाविक हजेरी लावतात. अशा मोठ्या गर्दीच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने हा फिडर तातडीने कार्यान्वित करणे गरजेचे असतानाही प्रशासन डोळे झाकून बसले आहे, असा आरोप शितल धोंडरे यांनी केला.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
केवळ निवेदन देऊन न थांबता, शितल धोंडरे यांनी दोषी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. "सहा महिने फिडर बंद ठेवून जनतेला वेठीस धरणे हा गुन्हाच आहे. जर पुढील ७ दिवसांत जातेगावचा गावठाण फिडर पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही, तर महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल," असा निर्वाणीचा इशारा धोंडरे यांनी दिला आहे.
प्रमुख मागण्या:
 जातेगाव गावठाण फिडर तात्काळ चार्ज करून कार्यान्वित करावा.
लो-व्होल्टेज आणि ट्रिपिंगची समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी.
विलंब लावणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी व्हावी.

शितल धोंडरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता महावितरणच्या गोटात खळबळ उडाली असून, प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी