गोव्यातील प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी ‘कुशावती’ तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती



पणजी, ३१ डिसेंबर : गोव्यातील प्रशासन अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्यासाठी गोवा सरकारने ‘कुशावती’ हा राज्याचा तिसरा जिल्हा स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा परिषदांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे शासन व नागरिकांमधील अंतर कमी होऊन प्रशासन अधिक सुलभ होणार आहे.

नवीन कुशावती जिल्ह्यात सांगे, केपे, काणकोण आणि धारबांदोडा हे तालुके समाविष्ट असतील. भौगोलिक सलगता, समान संस्कृती आणि जीवनशैलीमुळे हे तालुके एकमेकांशी जोडलेले आहेत. या जिल्ह्याला कुशावती नदीचे नाव देण्यात आले असून ही नदी चारही तालुक्यांतून वाहत असल्याने ती या भागाची ओळख ठरते.

या निर्णयाची घोषणा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, “गोव्यातील तिसरा जिल्हा म्हणून कुशावती जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कुशावती नदीला चालुक्य काळापासून ऐतिहासिक महत्त्व आहे. या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे या भागाचे पर्यावरणीय महत्त्व अधिक बळकट होईल.”

नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांपर्यंत सहज पोहोच मिळेल, प्रशासकीय कामांचा निपटारा जलद होईल आणि स्थानिक प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडता येईल. पायाभूत सुविधा, पर्यटन, शेती आणि संबंधित क्षेत्रांच्या विकासाला यामुळे चालना मिळेल. विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखत सर्वसमावेशक प्रगती साधण्याच्या गोवा सरकारच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी