लिंबागणेश येथे महिला व विद्यार्थिनींनी मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करत “स्त्रीमुक्ती दिन” साजरा
लिंबागणेश : (दि. २५)
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील पंचशीलनगर येथे आज दि. २५ डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या पुढाकाराने महिला व शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या हस्ते मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करून स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ,प्रा.लेहनाजी गायकवाड, सुरेश निर्मळ, बालाजी निर्मळ, सर्जेराव थोरात, गणेश थोरात, ऋषिकेश निर्मळ, बाबासाहेब निर्मळ,उमाजी निर्मळ, राजाभाऊ निर्मळ,गोदाबाई निर्मळ,स्नेहल निर्मळ,सोनल निर्मळ,सविता निर्मळ,विजाबाई निर्मळ, चंद्रकला निर्मळ, दिव्या निर्मळ,सुशिला निर्मळ,श्रुती निर्मळ,आरोही निर्मळ, योगिनी निर्मळ, बबिता निर्मळ, स्वप्निल निर्मळ,यश निर्मळ, पोपट निर्मळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध,माता रमाई आंबेडकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच भारतीय संविधान ग्रंथाचे पूजन करून करण्यात आली. मनुस्मृतीच्या माध्यमातून स्त्रियांना सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारून पुरुषप्रधान संस्कृती बळकट करणाऱ्या, तसेच बहुजन व स्त्रियांना शिक्षण व मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या शोषणात्मक धार्मिक विचारसरणीविरोधात या कार्यक्रमातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
मनुस्मृतीसारख्या ग्रंथांमुळे स्त्रिया अपवित्र आहेत, त्यांना शिकण्याचा-शिकवण्याचा अधिकार नाही, संपत्तीवर हक्क नाही, कोणत्याही अवस्थेत स्त्री स्वतंत्र होऊ नये, अशा प्रकारची गुलामीची मानसिकता समाजात रुजवली गेली. या अन्यायकारक विचारसरणीविरोधात महिलांनी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येत प्रतिकात्मक दहन करून समतेचा आणि आत्मसन्मानाचा संदेश दिला.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या उपस्थितीत मनुस्मृतीचे सार्वजनिकरित्या दहन करण्यात आले होते. चवदार तळ्याचा सत्याग्रह व काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जातीभेद व स्त्रीदास्य नष्ट करण्याचा निर्धार त्या दिवशी व्यक्त करण्यात आला. दलित व स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा मार्ग मोकळा करणाऱ्या या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिन तसेच स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
Comments
Post a Comment