नियोजित लातूर–कल्याण जनकल्याण द्रुतगती मार्गाच्या आराखड्यात बदल करून बीड जिल्ह्यावासियांवर अन्याय करू नये
नियोजित लातूर–कल्याण जनकल्याण द्रुतगती मार्गाच्या आराखड्यात बदल करून बीड जिल्ह्यावासियांवर अन्याय करू नये
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने : डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि. २३)बीड जिल्ह्यातून प्रस्तावित असलेल्या लातूर–अंबेजोगाई–केज–बीड–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण या लातूर–कल्याण (जनकल्याण) द्रुतगती मार्गाच्या आराखड्यात बदल करून बीड जिल्ह्याला डावलण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि.२३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
परिवहनमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सदर द्रुतगती मार्ग लातूर–कळंब–पारा–ईट–खर्डा–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण या मार्गाने नेण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर केल्याचे समोर आले आहे. हा प्रस्ताव बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर अन्याय करणारा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या महामार्गामुळे बीड जिल्ह्यात उद्योगधंदे, रोजगारनिर्मिती तसेच कृषी व कृषीपूरक व्यवसायाला मोठा चालना मिळणार असून शेतकऱ्यांचे उत्पादन मुंबई–ठाणे महानगर प्रदेशापर्यंत जलदगतीने पोहोचू शकणार आहे. त्यामुळे बाजारपेठेचा विस्तार होऊन शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होणार असताना बीड जिल्ह्याला वगळण्याचा कोणताही निर्णय अन्यायकारक ठरेल, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले.
पूर्वनियोजित लातूर–कल्याण (जनकल्याण) द्रुतगती मार्गाच्या आराखड्यात कोणताही बदल करू नये, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले. जर नियोजित आराखड्यात बदल करण्यात आला, तर प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी येणारे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या समोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनात शेख युनूस, सुदाम तांदळे,शिवशर्मा शेलार,माजी सैनिक अशोक येड (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी), शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, कुलदीप करपे, गणेश मस्के,प्रा.ज्ञानेश्वर राऊत, सुहास जायभाये, गणेश नाईकवाडे, राजु गायके, अर्जुन सोनावणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पार्श्वभूमी
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लातूर ते मुंबई हे अंतर सध्याच्या सुमारे १०–१२ तासांवरून ४–५ तासांत पूर्ण करण्याच्या उद्देशाने लातूर–कल्याण (जनकल्याण) द्रुतगती मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार हा मार्ग लातूर–अंबेजोगाई–केज–बीड–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण असा प्रस्तावित आहे.
मात्र, प्रताप सरनाईक यांनी अंतर ६० ते ७० किलोमीटरने कमी होईल, खर्च व वेळेची बचत होईल आणि धाराशिव जिल्ह्यालाही लाभ होईल, असे कारण देत पर्यायी मार्ग सुचविला आहे. परंतु यामुळे बीड जिल्ह्यातील कृषीप्रधान शेतकरी व व्यावसायिकांना होणारा विकासाचा लाभ हिरावला जाणार असल्याने सदर प्रस्तावाला तीव्र विरोध करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment