बीड जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत रस्ते कामांमध्ये मोठा गैरव्यवहार, तांदळवाडी घाटमध्ये ओव्हरलॅपिंग व बोगस काम- नितीन सोनवणे
बीड, दि. ३१ डिसेंबर
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) 'मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते' योजनेअंतर्गत बीड तालुक्यातील तांदळवाडी घाट गावात मंजूर झालेल्या खडीकरण व सिमेंट रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रारदार नितीन सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज सादर केला आहे.तक्रारीनुसार, गावातील एकूण आठ रस्त्यांच्या कामांमध्ये स्पष्ट ओव्हरलॅपिंग (एकाच जागी वारंवार काम दाखवणे) आढळून आले आहे. प्रत्यक्षात मैदानी पातळीवर काम नसतानाही पोर्टलवर काम पूर्ण दाखवण्यात आले आहे. बोगस ठराव करून सरपंचांच्या खोट्या सह्या घेण्यात आल्या असून, अपलोड केलेले फोटो दुसऱ्या ठिकाणचे असल्याचेही समोर आले आहे. यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपव्यय झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.संबंधित कामांचा ठेकेदार उपसरपंच महादेव हरी खोसे असल्याने पदाचा गैरवापर करून कामे चुकीच्या पद्धतीने पूर्ण दाखवल्याचा आरोप आहे. तक्रारदारांनी मागणी केली आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र तपास पथक नेमावे. प्रत्यक्ष पाहणी, जीओ टॅगिंग, फोटो व नोंदींची पडताळणी करावी. दोषी ठेकेदार, ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच बोगस कामांचा निधी वसूल करावा. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिले व देयके स्थगित करावीत.आरोप असलेली कामे:सफेपुर रोड ते तांदळवाडी घाट तलावापर्यंत खडीकरण रस्ता.
शाहादेव सिरसट घर ते गायराना पर्यंत खडीकरण.
चक्रधर खोसे घर ते बाबुराव सिरसट घरापर्यंत खडीकरण.
मुख्य रस्ता ते हाजगुडे वस्ती सिमेंट रस्ता.
मुख्य रस्ता ते अंबादास सिरसट घर सिमेंट रस्ता.
मुख्य रस्ता ते सिरसट वस्ती खडीकरण.
मुख्य रस्ता ते चव्हाण वस्ती खडीकरण.
मुख्य रस्ता ते लमनबुवा देवस्थान खडीकरण.
या तक्रारीमुळे जिल्ह्यातील मनरेगा कामांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून चौकशी सुरू झाली असून, लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment