कापूस, सोयाबीन व तूर पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी 25 डिसेंबरला शेतकरी हक्क मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
कापूस, सोयाबीन व तूर पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी 25 डिसेंबरला शेतकरी हक्क मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड
बीड | प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून जात असून शेतीमालाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने गुरुवार, दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बीड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मोर्चा संयोजकांनी दिली.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
शेतकऱ्यांच्या कापसाला किमान ₹12,000 प्रति क्विंटल भाव देण्यात यावा.
सोयाबीनसाठी किमान ₹7,000 प्रति क्विंटल दर निश्चित करण्यात यावा.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) कडून होणारी अडवणूक थांबवून सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात यावा.
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या बाजार समित्या व व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
बाजारात कमी दराने खरेदी झालेल्या शेतमालाचा विक्रीदर व खरेदीदरातील फरक सरकारने अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना भरून द्यावा.
शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, सबसिडी, अनुदान व पीक विमा यांची थकीत रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.
या मागण्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांमध्ये तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. शेतकरी हक्क मोर्चाला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
Comments
Post a Comment