मौजे चन्हाटा गावात धार्मिक संपत्तीचा अपहार; सार्वजनिक मस्जिद पाडून बेकायदेशीर विक्री – मुस्लिम समाजात तीव्र संताप, कठोर कारवाईची मागणी
बीड – ( दि.२८ ) प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे चन्हाटा गावात धार्मिक संपत्तीचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गावातील सार्वजनिक मस्जिद पाडून तिच्या जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मुस्लिम समाजात तीव्र संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
ग्रामस्थ शेख युनुस महेबुब यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, बीड यांच्याकडे दिलेल्या लिखित निवेदनात म्हटले आहे की, मौजे चन्हाटा येथील मिळकत क्रमांक ३४१ ही जागा ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये ‘सहन नामा’ म्हणून नोंदवलेली होती. त्या ठिकाणी वर्षानुवर्षे सार्वजनिक मस्जिद अस्तित्वात होती, जी स्थानिक मुस्लिम समाज उपासनेसाठी वापरत होता.
मात्र, ग्रामसेवक आणि शेख शब्बीर यांनी संगनमत करून त्या मस्जिदीचे बेकायदेशीर पाडकाम केले आणि सुमारे तीस हजार रुपयांत ती जागा एका खाजगी व्यक्तीस विकल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या कृतीमुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या नसून ग्रामपंचायत रजिस्टर व सरकारी अभिलेखांचा गंभीर गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संपूर्ण व्यवहार अनैतिक, बेकायदेशीर आणि प्रशासनाच्या अधिकारांचा दुरुपयोग करणारा असल्याचे निवेदनात नमूद आहे.
या प्रकरणावर महसूल, पोलीस व ग्रामपंचायत विभागांनी संयुक्त चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कलम 295, 295(A), 420, 406, 409 आणि 120(B) अन्वये गुन्हे दाखल करावेत आणि प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी समाजातर्फे करण्यात आली आहे.
गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, “मस्जिद ही गावाच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग होती. तिचे पाडकाम हा केवळ धार्मिक अपमान नसून सार्वजनिक संपत्तीवर डाका घालण्यासारखा प्रकार आहे.”
या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास मोठे जनआंदोलन उभे राहू शकते, असा इशारा समाज नेत्यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment