बच्चु भाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आंदोलनाला पाठिंबा; लिंबागणेश येथे निदर्शने

बच्चु भाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आंदोलनाला पाठिंबा; लिंबागणेश येथे निदर्शने — डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश : (दि. ३०)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुख्य मागणीसह विविध शेतकरीविषयक मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चु भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे सुरू असलेल्या चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज लिंबागणेश येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.

“आपला भिडू बच्चु कडू! शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, बच्चु भाऊ तुम आगे बढो — हम तुम्हारे साथ है!” अशा घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला.

सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते; मात्र ते आश्वासन हवेतच विरले, असा आरोप या निदर्शनातून करण्यात आला. दिलेले आश्वासन तातडीने पाळावे आणि विनाकारण चर्चेचे गुऱ्हाळ लांबवू नये, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली.

ते म्हणाले, “महाराष्ट्रात दररोज १०-१२ शेतकरी आत्महत्या करत आहेत. अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाली आहे. अशा परिस्थितीत बच्चु भाऊ कडू यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, हीच खरी शेतकऱ्यांना उभारी देणारी कृती ठरेल.”

या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

यावेळी आंदोलनात राजेभाऊ गिरे, पांडुरंग वाणी, शिवशक्ती-भिमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, विक्रांत वाणी, सर्पमित्र अशोक जाधव, दामोदर थोरात, संजय घोलप, संतोष भोसले, सुदाम मुळे, उद्धव वाणी, शहादेव कोल्हे, गणपत तागड, सय्यद रफिक, गणेश घाडगे, भालचंद्र कुदळे, गुलाब कांबळे, सुदाम वाणी, प्रमोद निर्मळ, रामा वाणी, रमेश वाणी, सुंदरभाऊ जाधव, राजेभाऊ मंडलिक, कचरू निर्मळ, मारूती नाईगडे, मनोहर वाणी, शेख मुसाभाई, मेघराज येडे, गजेंद्र मोरे तसेच स्थानिक शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी