गौण खनिज विभागातील कर्मचाऱ्यांने पत्रकारांना धमकावणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा
गौण खनिज विभागातील कर्मचाऱ्यांने पत्रकारांना धमकावणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- ( दि.२०) दैनिक वास्तव बीडचे संपादक जितेंद्र सिरसाट यांनी दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी " बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची बोली लावाच! " या मथळ्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज अनुषंगाने होणारी आर्थिक लुट अनुषंगाने बातमी केल्याने संपादक जितेंद्र सिरसाट यांना जिल्हाधिकारी कार्यालयातुन महिला कर्मचाऱ्यांने फोनवरून वापरलेली एकेरी भाषा व उचलून आणण्यात येईल अशी गर्भित धमकी वजा दमदाटी केल्यामुळे एकंदरीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारीतेवर हा हल्ला असुन यांच्या निषेधार्थ आणि संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व बीड तालुकाध्यक्ष शिवशर्मा शेलार, ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी अपर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर आणि जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे. बीड जिल्ह्यातील गौण खनिज तस्करी प्रकरणात यापूर्वीही " जिल्हाधिकारी हटवा आणि बालाघाटाच्या हिरव्या डोंगर रांगा वाचवा" "जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली " आदि लक्ष्यवेधी आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेली आहेत परंतु ठोस कारवाई करण्यात आलीच नाही.
बालाघाटाच्या कुशीतील हिरव्या गार डोंगर रांगा पोखरल्या जाताना गौण खनिज विभाग कुंभकर्णी झोपेत
बीड जिल्ह्यातील गौण खनिज तस्करी प्रकरणात गौण खनिज विभागाचे अधिकारी कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत कार्यालयातील गौण खनिज अधिकारी आणि कर्मचारी यांना गौण खनिज तस्करी बाबत निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असतात. चौकशीच्या नावाखाली प्रकरणे प्रलंबित ठेवतात. संबंधित प्रकरणात विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध होतात. शासनाचा महसूल बुडतो तसेच बीड तालुक्यातील बालाघाटाच्या कुशीतील हिरव्या डोंगर रांगा गौण खनिज तस्करीमुळे नामशेष होत आहेत.बीड जिल्ह्यातील खडी क्रशर अवैध रित्या चालतात.जिल्हाधिकारी यांनी खडीक्रशरची वीजपुरवठा तोडण्याचे आदेश देऊनही वीज पुरवठा खंडित केला जात नाही.याकडे गौण खनिज अधिकारी कठोर कारवाई करण्याचे टाळतात. याप्रकरणी आम्ही यापूर्वीही सतत निवेदने आणि आंदोलने केली आहेत परंतु अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तेव्हा गौण खनिज विभाग कुंभकर्णी झोपेत असतो का? असा संतप्त सवाल डॉ.गणेश ढवळे यांनी केला आहे.
Comments
Post a Comment