ऐतिहासिक रणखांब शिलालेख बेकायदेशीर स्थलांतरण प्रकरणी संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाला तक्रार ; कारवाईची मागणी
ऐतिहासिक रणखांब शिलालेख बेकायदेशीर स्थलांतरण प्रकरणी संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाला तक्रार ; कारवाईची मागणी :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- ( दि.१२ ) बीड शहरातील चंपावती विद्यालय नगर रोडवरील फुटपाथवरील पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अधिकार क्षेत्रातील संरक्षित स्मारक " रणखांब शिलालेख" पुरातत्व विभागाच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच कंत्राटदार आणि पुरातत्व व संग्रहालय विभागातील काही अधिकारी संगनमताने जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून दुरूस्तीच्या आदेशावर मुळ जागेवरून स्थलांतरित करण्याचे षडयंत्र रचले जात असुन संबंधित प्रकरणात वरीष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून पुरातत्व व शासनाची दिशाभूल करणा-या कंत्राटदार व आधिका-यांवर महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातन वास्तू शास्त्र विषयक स्थाने व अवशेष अधिनियम १९६० अनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि रामनाथ खोड यांनी सुजित कुमार उगले संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना करून आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
आदिलशाही - निजामशाही काळातील महाराष्ट्रात अगदी थोडी दिशादर्शक व अंतर दाखवणारे दगडी स्तंभ आहेत.त्यापैकी एक स्तंभ बीड नगर रोडवरील चंपावती शाळेच्या समोर फुटपाथवर आहे.हा" रणखांब "स्तंभ दुभंगलेल्या अवस्थेत असुन या स्तंभावर फारसी व नागरी असे दोन लेख आहेत.हे लेख दक्षिणाभिमुख असुन याचा आकार ५ फुट बाय अडीच फुट असा असुन यावर " दर जमाने हजरत बु-हान निजलशाह बहादुर (फारसी) ,दर जमाने हजरत बु-हान निजलशा सुहरसन अलफ कसबे बीड मार्ग स्यहार ( नागरी) असा मजकूर आहे. हा लेख इतका महत्त्वाचा आहे की " बीड" या नावाचा ऐतिहासिक उल्लेख असलेला हा एकमेव शिलालेख आहे.त्यामुळे याला ऐतिहासिक दृष्ट्या खुप महत्व आहे.
महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातन वास्तुशास्त्र विषयक स्थाने व अवशेष अधिनियम १९६० नुसार कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळे
रणखांब शिलालेख शेजारी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभाग महाराष्ट्र शासनाने संरक्षित स्मारक म्हणून बोर्ड लावला असुन त्यावर महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातन वास्तुशास्त्र विषयक स्थानी व अवशेष अधिनियम १९६० यानुसार हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे जो कोणी सदर संरक्षित स्मारकाचा नाश करील ,काढून घेईल त्याचे नुकसान करेल, त्यात फेरफार करेल ते खराब करील किंवा त्याचे गैरवाजवी रीतीने उपयोग करेल तो वरील अधिनियमानुसार ३ महिने कारावास किंवा ५००० रुपयापर्यंत दंडास किंवा दोन्ही शिक्षेस पात्र राहतील असे संचालक पुरातत्व व वास्तु संग्रहालय महाराष्ट्र शासन यांच्या आदेशावरून नमुद केले आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या कायदेशीर बाबींची पूर्तता न करताच शिलालेख स्थलांतर प्रकरणी संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी डॉ.गणेश ढवळे व रामनाम खोड यांनी केली आहे.
ऐतिहासिक वास्तुंची पुरातत्व खात्याऐवजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने नोंद असणं धोकादायक ; ऐतिहासिक ठेवा नामशेष करण्याचे षडयंत्र:- रामनाथ खोड
बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू या पुरातत्व खात्यांतर्गत येतात या ऐतिहासिक वास्तूंची मालकी पुरातत्व खात्याच्या नावाने महसूल विभागी नोंद हवी परंतु या ऐतिहासिक रणखांब शिलालेख वास्तु मालकी कार्यकारी अभियंता यांच्या नावाने नोंद असुन त्यामुळे ऐतिहासिक वास्तुंचे आस्तित्वच धोक्यात आले आहे. पुरातत्व विभागाला बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेवा नामशेष करण्याचा कुटील डाव दिसून येत असुन संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे सदर शिलालेखाचे पी आर कार्ड आणि वसलेवार टिपण पाहता या वास्तुची एकुण जागा १४.३० चौरस मीटर आहे म्हणजे फुटात धरली तर पुर्व पश्चिम १४.३० फुट एवढी आणि दक्षिण उत्तर १२.३० फुट एवढ्या क्षेत्रावर हि ऐतिहासिक वास्तू उभारणे आवश्यक असताना तो शिलालेख ४ बाय ४ जागेत स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रामनाथ खोड यांनी सांगितले.
Comments
Post a Comment