मागासवर्गीय समाजाचे सर्व कर्ज माफ आणि महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ निधीत वाढ करण्याचे वचन देणारासच मतदान करा - रानबा गायकवाड
परळी प्रतिनिधी. महाराष्ट्रातील तमाम मागासवर्गीय समाजाचे विविध बँका आणि महामंडळाचे कर्जे माफ करण्याचे तसेच महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळात प्रत्येक वर्षी 5 हजार कोटी रुपयांची वाढ करण्याचे वचन देणाऱ्या उमेदवार अथवा पक्षालाच समाजाने मतदान करावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रानबा गायकवाड यांनी पुढे म्हटले आहे की,देशातील मोठ्या उद्योजकांची अब्जावधी रुपयांची कर्जे केंद्र आणि राज्य सरकारने माफ केलेली आहेत.परंतू सर्वसामान्य, गोरगरीब, मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी असणाऱ्या विविध खाते आणि योजनेअंतर्गत तरतुतीमध्ये प्रचंड कपात केलेली आहे. तसेच गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळासाठी बजेट दिले जात नाही. वर्षाकाठी काही कोटींची तरतूद करून बौद्ध समाजाच्या तोंडाला पाणी पुसले जात आहेत.
सध्या सर्वत्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.महायुती असो अथवा महाविकास आघाडी याबरोबरच जे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांनी मागासवर्गीय समाजाचे कर्ज माफ करण्याची तसेच महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळात प्रत्येक वर्षी किमान 5000 कोटी रुपयांची तरतूद करण्याची हमी, वचन द्यावे अशा उमेदवारालाच मतदान करावे असे आवाहनही रानबा गायकवाड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment