वाचनाची आवड असली की सवड मिळतेच - बाबासाहेब उजगरे



वडवणीत तालुकास्तरीय महावाचन उत्सव साजरा 



वडवणी,दि.१२(प्रतिनिधी) आपल्या बुध्दीचा जर सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर त्यासाठी वाचन हे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याकडे शब्दसाठा उपलब्धतेसाठी वाचनाशिवाय गत्यंतर नाही. ज्या व्यक्तींचे वाचन कौशल्य विकसित आहे त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास व कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची जिद्द आपोआप निर्माण होते. प्रत्येक जण व्यस्ततेचे कारण देवून वाचनापासून अलिप्त राहात आहे. मात्र आपल्यात जर वाचनाची आवड असेल तर त्यासाठी सवडही निश्चितपणे मिळतेच. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची सोबत धरावी व स्वतःला स्वयंपूर्ण बनवावे असे प्रतिपादन वडवणी तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगरे यांनी वडवणी येथील तालुकास्तरीय महावाचन उत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी व्यक्त केले. 
                                    याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामबाग वडवणी याठिकाणी नुकतेच तालुकास्तरीय महावाचन उत्सव याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील विविध शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांनी सहभागी होत ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक प्रदर्शन भरविले होते. हा महावाचन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामबाग या शाळेतील विद्यार्थ्यांची शहरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. त्यानंतर या महावाचन उत्सवाचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगरे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी वडवणी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच प्राध्यापक व शिक्षक वर्ग आणि असंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांनी याप्रसंगी या महावाचन उत्सवाच्या अनुषंगाने उपस्थितांना अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील काही निवडक विद्यार्थ्यांनी आपण वाचन केलेल्या ग्रंथ व पुस्तकांवर आपल्या मनोगतातून अभिप्राय दिले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन रामबाग शाळेचे मुख्याध्यापक कागणे सर यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षिका राख मॅडम यांनी केले. तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार सहशिक्षक डोरले सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामबाग शाळेचे जाधव मॅडम, जाधवर मॅडम, गव्हाणे मॅडम, कुंभार मॅडम, यांच्यासह वडवणी तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !