'चतुरंग'चा भरगच्च कार्यक्रम पत्रिकेचा सुवर्णमहोत्सवी आनंदसोहळा!


मुंबई: प्रतिवर्षी डिसेंबर महिन्यात आपल्या जीवनगौरव पुरस्कारासाठी होणाऱ्या 'रंगसंमेलना' व्यतिरिक्त यावर्षी 'चतुरंग प्रतिष्ठान'ने आपल्या पन्नाशीच्या पूर्तते निमित्ताने मुंबईमध्ये याच सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दोन दिवसांच्या सुवर्णमहोत्सवी आनंद सोहळ्याचे आयोजन केले आहे. १४ विद्या ६४ कलांसारख्या बहुविध क्षेत्रातील प्रतिनिधिक अशा ११ नामवंत गुणवंतांचा 'चतुरंग सुवर्णरत्न सन्माना'ने जाहीर सन्मान करताना, त्यांच्या गौरवाप्रित्यर्थ नृत्य.. नाट्य.. साहित्य.. संवाद.. गायन-वादन.. अशा कलाविष्कारांचे विशेष आयोजन केले आहे. यामध्ये नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांची 'अर्घ्य' ही नृत्यवंदना आहे.. टेलिव्हिजन मालिकाविश्वात खूप लोकप्रिय झालेल्या 'हास्यजत्रा' या मालिकेतील सचिन गोस्वामी, सचिन मोटे, पृथ्विक प्रताप, रोहित माने, शिवाली परब या हास्यजत्रावीरांची, सुधीर गाडगीळांचा वारसा चालवणारे 'मित्र म्हणे' फेम सौमित्र पोटे हे 'मुलाखत' घेणार आहेत.. कविवर्य कुसुमाग्रज आणि नाटककार शिरवाडकर हे जर समोरासमोर आले-भेटले तर त्यांच्यात होऊ शकणाऱ्या संवाद-गप्पांचा सौ. धनश्री लेले लिखित 'हा सूर्य... हाच चंद्र!' हा कुतूहलजन्य नाट्यप्रयोग, दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली अजय पूरकर आणि दीपक करंजीकर सादर करणार आहेत.. गानप्रिय रसिकश्रोत्यांमध्ये सर्वसाधारणपणे खूप लोकप्रिय असलेल्या सर्व प्रकारच्या गाण्यांची 'ओठांवरची आवडती गाणी' ही संगीत मैफल, सध्याचे आघाडीचे रसिकपसंत युवा गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शमिका भिडे हे सादर करणार आहेत..

चतुरंग संस्थेच्या पायाभरणीकारांना कृतज्ञ वंदन करण्याच्या समारंभात आणि लक्षवेधी, उत्तुंग कारकीर्दीच्या पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. उल्हास कशाळकर, श्री. अशोक पत्की, श्री. दिलीप प्रभावळकर, श्री. बाबासाहेब कल्याणी, मेजर महेशकुमार भुरे, डॉ.अनिल काकोडकर, श्री.महेश एलकुंचवार, श्री.वासुदेव कामत, श्रीमती रोहिणी हट्टंगडी, आणि श्री.चंदू बोर्डे या नामवंत, गुणवंत मान्यवरांचा 'चतुरंग सुवर्णरत्न सन्माना' ने गौरव होणाऱ्या खास समारंभात विशेष सहभागी म्हणून ॲड. उज्वल निकम, अविनाश धर्माधिकारी, देवकी पंडित, धनश्री लेले, विजय केंकरे, सुहास बहुळकर, श्रुती भावे-चितळे, स्वानंद बेदरकर, आदित्य शिंदे, समीरा गुजर आदी नामवंतांचा समावेश असणार आहे....

इतक्या बहुविध समाविष्टतेचा आणि चतुरंग पन्नाशीचा भव्योत्सवी सुवर्णानंद सोहळा शनिवार-रविवार दिनांक २८-२९ सप्टेंबर २०२४ या दोन्ही दिवशी दुपारी ४-०० ते रात्रौ १०-०० या वेळेत दादर-माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरामध्ये चतुरंगने आयोजित केलेला आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानने अतिशय अत्यल्प दराच्या प्रवेशिका ठेवल्या असून, निमंत्रितासाठी ठेवलेल्या राखीव जागांव्यतिरिक्तच्या प्रवेशिका शनिवार दि.२१ सप्टेंबर पासून ticketkhidakee.com वर on line booking पद्धतीने आणि थिएटरवर सकाळ-संध्याकाळ उपलब्ध होतील असे चतुरंगने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !