बीडच्या सहयोग नगरमध्ये टोळक्याचा थरार; पिता–पुत्रावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला
बीडच्या सहयोग नगरमध्ये टोळक्याचा थरार; पिता–पुत्रावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला
याआधीही घरात घुसून महिलांना मारहाण; पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील सहयोग नगर परिसर आज सकाळी पुन्हा एकदा दहशतीच्या छायेत गेला. सदाशिव कोकाट आणि त्यांचा मुलगा हे नेहमीप्रमाणे आपल्या दुकानाकडे जात असताना, त्यांच्या एमआयडीसी भागातील घरासमोर दबा धरून बसलेल्या टोळक्याने भररस्त्यात त्यांच्यावर काठ्या-लाठ्यांनी व शस्त्रांनी हल्ला चढवला. या बेदम मारहाणीत पिता–पुत्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी अचानक रस्ता अडवून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. काही क्षणातच परिसरात गोंधळ उडाला. नागरिकांनी धाव घेईपर्यंत हल्लेखोरांनी दोघांना गंभीर जखमी करून पसार झाल्याचे सांगितले जाते.
पाच दिवसांपूर्वीही घरात घुसून हल्ला
या घटनेपूर्वी अवघ्या पाच दिवसांपूर्वी याच टोळक्याने कोकाट कुटुंबाच्या घरात घुसून महिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या टोळक्यात काही महिलांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. त्या वेळी छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र “आम्ही मारहाणीची तक्रार का दिली?” या कारणावरून सूडबुद्धीने आजचा हल्ला झाल्याचा आरोप कोकाट कुटुंबीयांनी केला आहे.
‘कॅमेऱ्यामुळेच वाद’ – कोकाट कुटुंबाचा आरोप
कोकाट कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, समोरच्या घरात बेकायदेशीर व्यवसाय सुरू असून त्यांच्या घरावर सुरक्षेसाठी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे समोरील लोकांना अडथळा निर्माण होत आहे. “गेल्या तीन वर्षांपासून आम्हाला सातत्याने त्रास दिला जात आहे. अनेक वेळा पोलिसांत तक्रारी दिल्या, पण ठोस कारवाई झाली नाही,” असा गंभीर आरोप सदाशिव कोकाट यांनी केला आहे.
पोलिसांवरही गंभीर आरोप
“तक्रार दिल्यानंतरही आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. उलट आम्हालाच गप्प बसण्यास सांगितले जाते,” असा थेट आरोप कोकाट कुटुंबाने पोलिस प्रशासनावर केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
नागरिकांत संताप
घटनेनंतर सहयोग नगर परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांनी तात्काळ कडक कारवाईची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित टोळक्यावर कठोर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे सहयोग नगरमधील नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे.
Comments
Post a Comment