शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
परळीतील महापशुधन एक्स्पोच्या तयारीचा आढावा
(यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव)
मुंबई, दि. 5 : राज्यातील शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत ‘महापशुधन एक्स्पो’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्या दृष्टिने प्रदर्शनाच्या आयोजनाची तयारी करावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत ‘महापशुधन एक्स्पो’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या तयारीचा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती मुंडे यांनी आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, सशक्त पशुधन हा उद्देश ठेवून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे. राज्यातील शेतकरी व पशुपालकांना नवनवीन पशुधनाची, त्यांच्या निगराणीविषयक तसेच या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी महापशुधन एक्स्पो महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांच्या दृष्टिकोनातून प्रदर्शनाच्या आयोजनाची तयारी करावी. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत. या प्रदर्शनात जैविक शेती, पशुधनापासून होणारे लाभ याविषयी माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी चर्चासत्रे आयोजित करण्यात यावीत.
पशुप्रदर्शनात 1500 पशु प्रदर्शीत करण्यात येणार आहेत. त्याशिवाय राज्य शासनाच्या कृषी, महिला व बालविकास यासह विविध विभागांचे माहितीपर स्टॉल असणार आहेत. तसेच बचतगटांचे स्टॉलही या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. प्रदर्शनास भेट देणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने या सर्वांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रदर्शनाचा परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यात यावा. महिलांसाठी वेगळा कक्ष उभारून त्या ठिकाणी आवश्यक सुविधा व सुरक्षितता उपलब्ध असावी. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या पशुंच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. त्याशिवाय वैद्यकीय सुविधा कक्ष, रुग्णावाहिका, अग्निशमन यंत्रणा, पोलिस संरक्षण, स्वयंसेवक यांचीही नियुक्त करण्यात यावी, अशे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिले.
या प्रदर्शनात विविध जातींच्या पशुंचा समावेश असणार आहेत. त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था, डॉग शोसह विविध प्राण्यांसाठी 40 प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे योग्य मूल्यांकन करण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यातील पशुंशिवाय परराज्यातील गुणवंत व दर्जेदार पशुपक्षी यांचेही प्रदर्शन होईल. याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. प्रदर्शनाच्या ठिकाणी रक्तदान शिबिर, अवयवदान संमती पत्र आदी सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
महिला व विद्यार्थ्यांना पशुप्रदर्शन पाहण्यासाठी दुपारच्या वेळी विशेष वेळ ठेवण्यात यावा. तसेच राज्यातील पशुवैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, शेतकरी यांनाही निमंत्रित करण्यात यावे. राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रदर्शनास राज्यातील शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी यांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी यावेळी केले.
पशुसंवर्धन आयुक्त देवरे यांनी प्रदर्शनाच्या तयारीची माहिती दिली. प्रदर्शनास येणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून पशुधन घेऊन येणाऱ्या वाहनांसाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य सभास्थानी वीस हजार आसनक्षमता असणार आहे. त्याशिवाय पारितोषिक पात्र पशुधनांचे विशेष प्रदर्शन या ठिकाणी असणार आहे. तीन वेगवेगळ्या पेंडॉलमध्ये सुमारे 300 स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रदर्शनात पशुपालकांसमवेतच या क्षेत्रातील उद्योजकही सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी जॉन्सन यांनीही प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. प्रदर्शनात येणाऱ्या नागरिकांसाठी पहिल्या टप्प्यात वीस एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गर्दी नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आदींची तयारी करण्यात आली आहे. स्वयंसेवक म्हणून ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांचे सहाय्य घेण्यात येणार आहे. प्रदर्शनात महिला व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच पोलीसांचे हेल्प डेस्क उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
००००
Comments
Post a Comment