माता रमाई जयंतीनिमित्त तालुकास्तरी शालेय व महाविद्यालयीन निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादराजलक्ष्मी जाधव प्रथम, मानसी शेरकर द्वितीय, रिया जगतकर तृतीय
माता रमाई जयंतीनिमित्त तालुकास्तरी शालेय व महाविद्यालयीन निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
राजलक्ष्मी जाधव प्रथम, मानसी शेरकर द्वितीय, रिया जगतकर तृतीय
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
माता रमाई जयंती उत्सव समिती, पंचशील नगर परळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरी शालेय व महाविद्यालयीन निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक जाणीव, विचारप्रवर्तक लेखन व अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ही स्पर्धा विशेष लक्षवेधी ठरली. या स्पर्धेत असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
ही निबंध स्पर्धा मासाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनकार्य व विचारांवर आधारित घेण्यात आली होती. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गटसाधन केंद्र, परळी यांनीही मोलाचे सहकार्य केले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक राजलक्ष्मी विकास जाधव (माऊंट लिटरा झी स्कूल, परळी) हिने पटकावला. द्वितीय क्रमांक मानसी नवनाथ शेरकर (जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मोहा) हिने मिळवला, तर तृतीय क्रमांक रिया रावसाहेब जगतकर (कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला (कनिष्ठ) महाविद्यालय, परळी वैजनाथ) हिने पटकावला.
प्रोत्साहनपर बक्षिसे प्रतिज्ञा बाबासाहेब रोडे (मिलिंद ज्युनिअर महाविद्यालय, परळी), आर्वी आशिष आरगडे (संस्कार प्राथमिक शाळा, परळी) आणि गीता रामकिशन तिडके (जिल्हा परिषद शाळा, लाडझरी) यांना जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व पेन सप्रेम भेट देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ. विनोद जगतकर, प्रा. प्रवीण फुटके (पत्रकार) आणि प्रा. डॉ. प्रवीण दिग्रसकर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या लेखनातील सामाजिक भान, विचारांची खोली व सादरीकरणाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
स्पर्धेतील प्रथम बक्षीस ५,००० रुपये, द्वितीय बक्षीस ३,००० रुपये व तृतीय बक्षीस २,००० रुपये असून ही बक्षिसे मुक्त शिक्षक संघटना जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे यांच्यातर्फे देण्यात येणार आहेत.
तसेच प्रोत्साहनपर तीन बक्षिसे प्रत्येकी १,००० रुपये सचिन रणखांबे यांच्यातर्फे दिली जाणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना पेन व प्रमाणपत्र प्रा.डॉ.विनोद जगतकर यांच्यातर्फे प्रदान करण्यात येणार आहे.
माता रमाई यांच्या विचारांचा प्रसार व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेली ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पंचशील नगर येथील वैशाली बौद्ध विहार येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.
Comments
Post a Comment