स्व. अमोल गलधर यांच्या जयंतीनिमित्त लिंबागणेश येथे रक्तदान शिबिराचे आयोजन



लिंबागणेश :-(दि.०८)स्व. अमोल गलधर यांच्या जयंतीनिमित्त आज रविवार दि. ०८ रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्व. अमोल गलधर युवा मंच, लिंबागणेश यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. अमोल गलधर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली. यावेळी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश आंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉ. गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ, पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी स्व. अमोल गलधर यांच्या सामाजिक कार्याचा व जनतेसाठी दिलेल्या लढ्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
स्व. अमोल गलधर यांनी बीड रेल्वेसाठी उभारलेला संघर्ष, टॉवरवर चढून केलेले शोले स्टाईल आंदोलन, आकाशवाणी बंद पाडण्याचे आंदोलन, तसेच तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुतळ्याचे दहन करून त्याची राख शासकीय कार्यालयात पाठवण्याचे धाडसी आंदोलन यामुळे ते सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय होते. यासोबतच बीड जिल्हा रुग्णालयात गोरगरिबांच्या सेवेसाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे, असे मत तंटामुक्ती समिती अध्यक्ष डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केले.

स्व. अमोल गलधर यांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत स्व. अमोल गलधर युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

“रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपण दिलेले रक्त संकटाच्या वेळी अनेकांचे प्राण वाचवू शकते. रक्तपेढ्यांमध्ये नेहमीच रक्ताची टंचाई असते, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागते. अनेक वेळा रक्त न मिळाल्याने दुर्दैवी घटना घडतात. अशा परिस्थितीत रक्तदान करून गरजू रुग्णांना मदत करण्याची संधी युवा मंचने उपलब्ध करून दिली आहे,” असे मत डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केले.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्व. अमोल गलधर युवा मंचचे पदाधिकारी शंकर वाणी, औदुंबर नाईकवाडे, सय्यद अख्तर, सुरज कदम, सचिन आगवान, करन वायभट, संतोष शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी गणेश रोटे, संतोष गायकवाड, सतीश गायकवाड यांनी रक्तसंकलन केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी दत्ता झोडगे, ज्योत्स्ना शिंदे, सीमा हिंदोळे यांच्यासह अ‍ॅड. गणेश वाणी, दादा गायकवाड, बाळकृष्ण थोरात, रामचंद्र मुळे, अक्षय येडे, गणेश घाडगे, ओंकार पवार, उमेश थोरात, बबलू आबदार, पप्पू थोरात, रोहित तागड, केशव गिरे, विजय वाणी, जीवन मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी