अंबाजोगाई ग्रासलॅड सफारी” चा शुभारंभ
बीड, दि. 06 :बीड वन विभागांतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय परळी मध्ये जैवविविधता संवर्धन व रोजगार निर्मिती या उद्देशाच्या अनुषंगाने अंबाजोगाई शहरालगत असलेल्या वन विभागाच्या डोंगराळ, खुरट्या व गवताळ वनक्षेत्रात “अंबाजोगाई ग्रॅसलँड सफारी” या उपक्रमाची दिनांक 26. 1. 2026 रोजी विधानसभेच्या सदस्या नमिता मुंदडा अंबाजोगाई, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अंबाजोगाई नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, विभागीय वनाधिकारी अमोल गरकळ, विभागीय अधिकारी सामाजिक वनीकरण श्रीनिवास लखमावार, अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी दीपक वांजळे, अंबाजोगाई तहसीलदार विलास तरांगे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी वनक्षेत्रात महात्मा गांधी प्राणी संग्रहालय सोलापूर येथील 33 काळवीट जातीच्या हरणास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
परळी वनपरिक्षेत्रा अंतर्गत अंबाजोगाई शहरालगत वन विभागाचे एकूण १३२८.०६ हे.आर सलग राखीव नक्षत्र आहे. सदरचे क्षेत्र हे डोंगराळ खुरट्या व गवताळ प्रकारचे आहे यामध्ये विविध प्रकारचे वन्यप्राणी जसे की हरिण, लांडगा, कोल्हा, बीबट, तडस इत्यादी प्राण्यांचा तसेच विविध प्रकारच्या पक्षांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर आहे.
तसेच या क्षेत्रामधून वाणा नदीचा प्रवाह वाहत असल्यामुळे वन्य प्राणी व पक्षांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. तसेच अंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसराला निसर्गाची देण आहे.
दऱ्या- खोऱ्याने नटलेल्या या परिसरात निसर्ग सौंदर्याचे वैभव दाटलेले आहे. त्यात वनराई फुलण्याची गरज आहे. या परिसराला ऐतिहासिक महत्त्व असून सदरचे ठिकाण हे पर्यटनाच्या दृष्टीने योग्य असल्याने निसर्गरम्य परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून या ठिकाणी ३३ काळवीट ३३ काळवीट जातीच्या हरणास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
सदरच्या ग्रॅसलँड सफारीचा प्रकल्प मराठवाड्यासारख्या डोंगराळ भागात पहिलाच प्रयोग असून या प्रकल्पातुन जैवविविधतता वाढवणे तसेच वनाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा हेतू आहे. सदर प्रकल्प राबवल्यामुळे प्रकल्प क्षेत्रामध्ये विविध गवत प्रजातीची लागवड करून त्या ठिकाणी वन्य प्राण्यांना पानवठे निर्माण करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे जंगलातील प्राणी जंगलातच राहतील आणि पर्यायाने जंगल शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्यामुळे नुकसान होणार नाही.
तसेच या क्षेत्रालगत मराठीचे आद्यकवी स्वामी मुकुंदराजांचे समाधी मंदिर, जोगेश्वरी देवीचे मंदिर, संत दासोपंत यांची समाधी, बुट्टेनाथ मंदिर, किरमानी दर्गा, मौलाली दर्गा, हत्तीखाना, बाराखांबी मंदिर लेणी, आकर्षक नृत्य असलेले संकलेश्वर मंदिर, जैन लेण्या तसेच परळी येथे बारा ज्योतिर्लिंग पैकी असलेले प्रभू श्री वैद्यनाथ महादेवाचे मंदिर इत्यादी धार्मिक तसेच ऐतिहासिक मंदिर व वास्तू असल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांची संख्या अधिक असल्यामुळे या सफारीचा निश्चितच पर्यटकांना लाभ होईल तसेच स्थानिक लोकांना यापासून रोजगार निर्मिती सुध्दा होईल असे विभागीय वन अधिकारी (प्रा.) बीड यांनी नमूद केले आहे.
Comments
Post a Comment