शालेय बीज प्रदर्शनातून २५ हजार विद्यार्थ्यांमध्ये पेरली पर्यावरण संवर्धनाची बीजे
शालेय बीज प्रदर्शनातून २५ हजार विद्यार्थ्यांमध्ये पेरली पर्यावरण संवर्धनाची बीजे
वी वी फॉर एनवायरमेंट'चा ५० शाळेत यशस्वी उपक्रम
उद्या ३ फेब्रुवारीला रंगणार पारितोषिक वितरण समारंभ; पद्मश्री चैतरामजी पवार यांची प्रमुख उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन निसर्ग, शेती आणि देशी बियाण्यांशी विद्यार्थ्यांचे नाते जोडण्यासाठी 'WE… We For Environment' संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राबविण्यात आलेला 'शालेय बीज प्रदर्शन' (Seed Exhibition) हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे. जिल्ह्यातील ५० शासकीय व खासगी शाळांमधील सुमारे २५,००० विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून, या उपक्रमाचा भव्य बक्षीस वितरण, समारोप व सत्कार समारंभ उद्या, मंगळवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
२०० हून अधिक बियाण्यांची ओळख आजची पिढी निसर्ग आणि शेतीपासून दूर जात असताना, त्यांना जैवविविधतेचे महत्त्व समजावे या हेतूने ही संकल्पना राबवण्यात आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना २०० हून अधिक प्रकारच्या भारतीय व देशी बियाण्यांची माहिती देण्यात आली. आजी-आजोबा आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांनी स्वतः बियाणे संकलित केले, ज्यामुळे त्यांच्यात संशोधन वृत्ती आणि संवाद कौशल्य विकसित झाले.
*विविध स्पर्धा आणि ३०० विजेते*
केवळ प्रदर्शनच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्मरणशक्ती स्पर्धा, माहिती सादरीकरण, बीज ओळख आणि पर्यावरण विषयक उपक्रम अशा चार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातून निवडल्या गेलेल्या ३०० गुणवंत विद्यार्थ्यांना ३ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
*समारोप समारंभ आणि मान्यवर*
या सोहळ्यासाठी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ पद्मश्री चैतरामजी पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
*या उपक्रमाच्या यशासाठी महत्त्वाचे योगदान*
सौ. मेघना बडजाते (अध्यक्षा, वी फॉर एनवायरमेंट),श्री. संजय अंबेकर (कार्याध्यक्ष),डॉ. संजय डांभारे (डीन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय),श्री. युनूस पटेल व श्री. किरण मास्टर (मुख्याध्यापक संघ)
यासोबतच डॉ. शुभदा कोराने, कैलास राठोड आणि शिक्षक प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment