महामाता भीमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
बीड प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा, बीड तालुका यांच्या वतीने बीड येथील महासभेच्या कार्यालयात महामाता भीमाई रामजी आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला बौद्ध बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामाता भीमाई आंबेडकर तसेच बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी श्रामणेर बोधाचार्य बुद्धघोष यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व बौद्ध उपासकांना त्रिसरण व पंचशील देऊन आध्यात्मिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे बीड तालुका अध्यक्ष. राजेंद्र ससाणे हे होते. यावेळी ॲड. जाधव, ओमप्रकाश गायकवाड, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष गोपीनाथ बनसोडे यांनी महामाता भीमाई यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महामाता भीमाई या सुभेदार रामजी सकपाळ (आंबेडकर) यांच्या पत्नी आणि धर्माजी पंडित (मुरबाडकर) यांच्या कन्या होत्या. त्या स्वाभिमानी, कर्तृत्ववान आणि आत्मसन्मान जपणाऱ्या महिला होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कधीही कोणापुढे हात पसरला नाही. त्यांच्या संस्कारांचा प्रभाव पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीत मोठ्या प्रमाणात दिसून येतो, असेही वक्त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गौतम खेमाडे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमास विश्वभर बनसोडे, ॲड. सोनवणे, सिद्धार्थ गरुड तसेच इतर बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी अध्यक्ष राजेंद्र ससाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ‘सरनतय’ ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
महामाता भीमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये बौद्ध समाजात उत्साहाचे व प्रेरणेचे वातावरण पाहायला मिळाले.
Comments
Post a Comment