लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
लिंबागणेश : (दि. ०७) भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी, त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती आज शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते. सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी प्रास्ताविक केले, तर सुरेश निर्मळ यांनी आभारप्रदर्शन केले.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश ढवळे यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "थॉट्स ऑन पाकिस्तान" हा ग्रंथ माता रमाईंना अर्पण केला होता. बाबासाहेबांनी रमाईंच्या त्यागाबद्दल लिहिताना म्हटले होते —
"रमा, तू नसतीस तर मी भीमाचा भिमराव आणि भिमरावाचा बाबासाहेब होऊ शकलो नसतो."
डॉ. ढवळे यांनी माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत सांगितले की, लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेली रमाई, सासरीही अनेक आप्तस्वकीयांच्या मृत्यूचे दुःख सहन करत आयुष्यभर धैर्याने उभी राहिली. सासरे सुभेदार रामजी, बाबासाहेबांचे बंधू, पुतण्या, सावत्र आई तसेच स्वतःच्या मुलांच्या निधनाचे दुःख त्यांनी शांतपणे सहन केले.
रमेश, गंगाधर, राजरत्न आणि इंदू या मुलांच्या वियोगाचे वेदनादायी क्षण त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले, मात्र बाबासाहेबांच्या शिक्षणकार्याला व समाजोद्धाराच्या ध्येयाला त्यांनी कधीही बाधा येऊ दिली नाही. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला अखंड साथ दिली.
"माता रमाई यांचे योगदान केवळ कौटुंबिक नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अमूल्य आहे," असे प्रतिपादन डॉ. ढवळे यांनी केले. वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले, मात्र त्यांच्या त्यागामुळे त्या आजही दिनदलितांची माता रमाई म्हणून स्मरणात आहेत.
कार्यक्रमात रविंद्र निर्मळ आणि पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनीही समायोजित भाषणे केली.
यावेळी माजी उपसरपंच शंकर वाणी, दादा गायकवाड, बाळकृष्ण थोरात, शिवाजी जाधव, गणपत तागड, जितेंद्र निर्मळ, सर्पमित्र अशोक जाधव, राहुल निर्मळ, सिताराम थोरात, संजय पावले, जीवन मुळे, सुखदेव वाणी, प्रमोद निर्मळ, जगन्नाथ मोरे, शाकींदर काटकर, कल्याण मांडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment