भीमनगरमधील अनधिकृत अतिक्रमण त्वरित हटवा : रतन आदोडे यांचा इशारा

भीमनगरमधील अनधिकृत अतिक्रमण त्वरित हटवा : रतन आदोडे यांचा इशारा
परळी (प्रतिनिधी) – भीमनगर येथील सर्व्हे नंबरवरील नवीन प्लॉटिंगमध्ये नागरिकांसाठी राखीव ठेवलेल्या सार्वजनिक जागेवर झालेल्या अनधिकृत अतिक्रमणाविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या नावाने उद्यान व भव्य सभागृह उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सदर जागेवर गौतम पंचांगे यांच्या कुटुंबाकडून बेकायदेशीरपणे पत्र्याचे कुंपण करून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप रतन आदोडे यांनी केला आहे.

रतन आदोडे यांनी सांगितले की, या अतिक्रमणाबाबत नगरपरिषद परळी वैजनाथ येथे अधिकृत लिखित तक्रार सादर करण्यात आली आहे. तसेच संबंधितांकडे जागेचा कोणताही कायदेशीर पुरावा नसल्याची माहितीही प्रशासनाला देण्यात आली आहे. तरीदेखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

आरोपानुसार, मंदिर कमिटी व नगरपरिषद यांच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून संबंधितांनी माता रमाई आवास योजनेचाही लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील सर्व तपशील नगरपरिषद मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आले असूनही प्रशासन मौन बाळगत असल्याची टीका आदोडे यांनी केली.

“सार्वजनिक हिताच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून नागरिकांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हे अतिक्रमण हटवावे, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशाराही रतन आदोडे यांनी दिला आहे.

भीमनगर परिसरातील नागरिक आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असून, सार्वजनिक जागा मोकळी करून नियोजित उद्यान व सभागृह उभारणीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी