जियोच्या खंडित सेवेमुळे लिंबागणेशमध्ये ग्राहक त्रस्त; बहिष्काराचा इशारा
लिंबागणेश प्रतिनिधी
बीड तालुक्यातील लिंबागणेशसह परिसरात रिलायन्स जिओची सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रेंज पूर्ण दाखवत असतानाही इंटरनेट सेवा बंद पडणे, कॉल न लागणे, कॉल ड्रॉप होणे अशा समस्यांचा नागरिकांना सातत्याने सामना करावा लागत आहे.
या तांत्रिक अडचणींमुळे दवाखान्याची तातडीची कामे, ऑनलाईन व्यवहार, शासकीय सेवा, पैसे पाठविणे आदी महत्त्वाची कामे ठप्प होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यासावर तसेच व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, युवकांनी जिओ कंपनीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त केला असून अनेकांनी आपले सिम कार्ड इतर कंपन्यांकडे पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीकडून प्रतिनिधीमार्फत मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी “आमिष नको, अखंडित सेवा द्या” अशी ठाम भूमिका युवकांनी घेतली आहे.
सेवा तात्काळ सुरळीत न झाल्यास ‘शोले स्टाईल’ आंदोलन करत टॉवरवर चढण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी कंपनीने तातडीने दखल घेऊन अखंडित नेटवर्क सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment